रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नो युवर कस्टमर (KYC) नियमांमध्ये बदल केला आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक नियमांमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी हा नियम बदल करण्यात आला आहे. त्यामुळं ग्राहकांची ओळख पटवणं अधिक सोपं होणार आहे.
मास्टर डायरेक्टिव्हमधील दुरुस्तीनुसार, केवायसी निर्देश, २०१६ अंतर्गत नियंत्रित संस्थांना (RE) युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड (UCIC) स्तरावर ग्राहक निष्पक्ष पडताळणी (CDD) प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यानुसार, आधीच केवायसी पूर्ण केलेल्या एखाद्या ग्राहकाला दुसरं खातं उघडायचं असेल किंवा त्याच संस्थेतून इतर कोणतंही उत्पादन किंवा सेवा घ्यायची असेल तर त्याची ओळख पटविण्यासाठी नवीन सीडीडी पडताळणी प्रक्रियेची आवश्यकता भासणार नाही. मास्टर डायरेक्शनमधील सुधारित तरतुदी तात्काळ प्रभावानं लागू होतील, असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.
जेव्हा आरईला ग्राहकांकडून अतिरिक्त किंवा अद्ययावत माहिती प्राप्त होईल, तेव्हा आरई सात दिवसांच्या आत किंवा केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या कालावधीत अद्ययावत माहिती सीकेवायसीआरला उपलब्ध करेल, जे सीकेवायसीआरमधील विद्यमान ग्राहकाचे केवायसी रेकॉर्ड अद्ययावत करेल. सीकेवायसीआर हे एक युनिट आहे जे डिजिटल स्वरूपात ग्राहकाचे केवायसी रेकॉर्ड मिळवते, साठवते, सुरक्षित करते आणि पुनर्प्राप्त करते.
केवायसीचा अर्थ नो युवर कस्टमर म्हणजेच तुमच्या ग्राहकाविषयी जाणून घ्या. ही एक ग्राहकाची योग्य ओळख पटवून घेण्याची प्रक्रिया आहे. याद्वारे बँका, विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांची ओळख आणि पत्त्याची पडताळणी करतात.
केवायसीची प्रक्रिया मनी लॉन्ड्रिंग किंवा फसवणुकीसारख्या बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असते. ग्राहकाची ओळख आणि पत्त्याबरोबरच त्यांचे नाव, संपर्क आणि रोजगाराचा तपशीलही समोर येतो. केवायसी प्रक्रिया सामान्यत: वैयक्तिकरित्या केली जाते. मात्र, डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून ही कामे ऑनलाइनही करता येतात.
आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, जॉब कार्ड किंवा सरकारने जारी केलेले पत्र यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता असते.