माझे लग्न झाल्यानंतर आईने मला मुंबईत स्वतंत्र फ्लॅट घेण्याचा सल्ला दिला, पण त्यासाठी माझ्यापुढे बऱ्याच अडचणी होत्या. बाबांनी धंद्यातून निवृत्ती पत्करली असली तरी दुकानांचे मालक अद्याप तेच होते, कारण त्यांच्याच कमाईचा सर्व पैसा धंद्यात गुंतला होता. मी त्यांचा मुलगा असलो तरी त्यांनी संपूर्ण व्यवसाय माझ्या नावावर केलेला नव्हता. उलट ते मला माझ्या कामाचा पगार नियमित देत होते. तरीही मी पगारी नोकर असल्याचे सॅलरी स्लिपसारखे बँकेला आवश्यक असणारे पुरावे मी देऊ शकत नव्हतो. मुख्य अडचण अशी होती, की बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी तारण ठेवायला माझ्याकडे स्वतःचे असे काहीच नव्हते. मी निराश झालो असे दिसताच आई मदतीला धावून आली. तिने तिच्याकडचे शिलकीत साठवलेले पाच लाख रुपये माझ्या हवाली केले आणि मुंबईच्या सोईस्कर उपनगरात फ्लॅट शोधण्यास सांगितले.
मी उत्साहाने ते पैसे माझ्या बँक खात्यात भरले. इतकी मोठी रक्कम बरेच दिवस बचत खात्यात पडून राहिल्याचे लक्षात आल्याने बँकेच्या मॅनेजरने एक दिवस मला विचारले, “साहेब, तुमच्या बचत खात्यात खूपच रक्कम विनावापर पडून आहे. गरज लागेपर्यंत तुम्ही ही रक्कम मुदतठेव म्हणून का ठेवत नाही? त्यावर तुम्हाला जास्त दराने व्याज मिळेल.” त्यावर मी ऐटीत उत्तर दिले, “मला घर घ्यायचे आहे आणि कोणत्याही क्षणी पैसे लागतील म्हणून मी ती रक्कम तयार ठेवली आहे.” त्यावर त्या मॅनेजरला गंमत वाटली. तो खवचटपणे म्हणाला, “कमाल आहे. पाच लाख रुपयांत मुंबईत साधी झोपडीही येणार नाही आणि तुम्ही फ्लॅट घेण्याचे स्वप्न बघताय?” हा शेरा ऐकताच माझा चेहरा पडला. त्या माणसाची बोलण्याची पद्धत योग्य नसली तरी तो सत्य तेच सांगत होता, खरोखरच तेवढ्या रकमेत मुंबईत कुठेही फ्लॅट मिळणार नव्हता. मग मी नाईलाजाने मुंबईबाहेरच्या उपनगरांकडे मोर्चा वळवला आणि कुठे स्वस्तात फ्लॅट मिळतोय का, याचा शोध घेऊ लागलो.
त्या सुमारास ठाणे शहराच्या बाहेर नव्या इमारतींचे बांधकाम सुरु होते तेथे एक तीन खोल्यांचा फ्लॅट १३ लाख रुपयांना मिळत होता. मी आईकडे गेलो व तिला ही किंमत सांगितली. आईने स्वतःकडचे पैसे दिलेच होते. आता उरलेल्या रकमेसाठी तिने बाबांकडे शब्द टाकला. बाबांनी प्रथम ही कल्पनाच फेटाळून लावली. “त्याला सांग, दुकान नीट सांभाळ म्हणावं, स्वतःचे घर घ्यायला निघालाय. लग्न झाले म्हणून लगेच वेगळं राहण्याची नाटके नकोत.”, अशा शब्दांत त्यांनी फटकारले, पण आई मात्र तिच्या विचारावर ठाम होती. तिने गोडीगुलाबीने आपला मुद्दा पटवून देऊन बाबांना राजी केले. मग बाबांनीही आढेवेढे घेत अखेर स्वतःकडचे पाच लाख रुपये दिले.
मला हायसे वाटले आणि मी विचार केला, की ‘चला आता सगळे सोपे झाले. तेरा लाखांपैकी दहा लाखांची तरतूद झाली. आता वरचे तीन लाख रुपये आपण सहज उभारु.’ पण तेही वाटले तितके सोपे ठरले नाही. बहुतेकांनी सबबी सांगून हात वर केले. पैसे देताना आणि घेताना माणसे कसे वेगवेगळे वागतात, हा धडा मिळाला. अखेर दोन-तीन जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडून परतफेडीचे पुढचे वायदे करुन मी कशीबशी ती रक्कम जमवली आणि एकदाचा फ्लॅट घेऊन टाकला. आयुष्यात प्रथमच एका मालमत्तेला माझे नाव लागले होते. मला त्या फ्लॅटने अपार आनंद, समाधान, आत्मविश्वास आणि सुरक्षितता दिली. पुढे त्याच फ्लॅटच्या विक्रीतून मी आणखी मोठा फ्लॅट घेतला. आईचा सल्ला खरा ठरला.
मित्रांनोऽ मालकीच्या घराचे एक वेगळे महत्त्व असे असते, की तेथे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मानसिक सुरक्षितता लाभते. घरखरेदीसाठी कर्ज घेतल्यास प्राप्तिकरात दीर्घकालीन सवलत मिळते. कालांतराने हे घर विकल्यास मूळ गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळतो. घरातून व्यवसाय चालवताना वास्तूचा वापर कार्यालय किंवा माल साठवण्याचे गोदाम म्हणूनही करता येतो. भारतातील छोटे व्यावसायिक आजही ‘नीचे दुकान, उपर मकान’ याच यशस्वी सूत्राचा उपयोग करतात. ‘भाड्याचे घर, अन् खाली कर’ असा कटू अनुभव येऊ द्यायचा नसेल तर कारकीर्दीच्या सुरवातीलाच स्वतःचे घर घेण्याची खटपट सुरू करावी. एक प्रसिद्ध संतवचन नेहमी लक्षात ठेवावे.
ऐसी बात बोलो, जो कोई न कहेगा झूठ।
ऐसी जगह चुनो, जहाँसे कोई न कहेगा उठ॥
(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)