LPG ekyc news : एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा; केंद्र सरकारनं केली महत्त्वाची घोषणा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LPG ekyc news : एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा; केंद्र सरकारनं केली महत्त्वाची घोषणा

LPG ekyc news : एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा; केंद्र सरकारनं केली महत्त्वाची घोषणा

Jul 09, 2024 01:40 PM IST

No time limit for LPG Cylinder eKYC : एलपीजी सिलिंडरच्या ई-केवायसीच्या संदर्भात केंद्र सरकारनं महत्त्वाची घोषणा केली आहे.

एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा; केंद्र सरकारनं केली महत्त्वाची घोषणा
एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा; केंद्र सरकारनं केली महत्त्वाची घोषणा

LPG Cylinder eKYC : देशभरातील कोट्यवधी एलपीजी सिलिंडर ग्राहकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. एलपीजी सिलिंडरसाठी eKYC करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांची धावाधाव थांबणार आहे.

तेल कंपन्यांनी ग्राहकांची बनावट खाती शोधून काढण्यासाठी आणि व्यावसायिक सिलिंडरची फसवी बुकिंग रोखण्यासाठी एलपीजी ग्राहकांना eKYC लागू केलं आहे. संबंधित गॅस एजन्सीमध्ये जाऊन ग्राहकांना ही ईकेवायसी करावी लागणार आहे. त्यामुळं प्रामाणिक व नियमित एलपीजी धारकांची गैरसोय होत असल्याचं केरळचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते सतीसन यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणलं होतं.

हरदीपसिंह पुरी यांनी सतीसन यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. 'ही प्रक्रिया आठ महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे. खऱ्याखुऱ्या ग्राहकांनाच एलपीजी सिलिंडर मिळावेत हा यामागचा उद्देश आहे, असं पुरी यांनी म्हटलं आहे.

eKYC प्रक्रिया कशी होतेय?

ईकेवायसी प्रक्रिये अंतर्गत एलपीजी डिलिव्हरी करणारे कर्मचारी ग्राहकाला एलपीजी सिलिंडर वितरित करताना त्यांच्या ओळखपत्रांची पडताळणी करतात. डिलिव्हरी कर्मचारी त्यांच्या मोबाईल फोनवरील ॲपद्वारे ग्राहकांचे आधार क्रेडेंशियल कॅप्चर करतात. ग्राहकाला एक OTP प्राप्त होतो. या ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार वितरक शोरूमशीही संपर्क साधू शकतात, असं हरदीपसिंग पुरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या सविस्तर पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ॲप इन्स्टॉल करा आणि स्वतः eKYC करा

एलपीजी सिलिंडर ग्राहक इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil corporation), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited) सारख्या कंपन्यांचे ॲप्स इन्स्टॉल करू शकतात आणि स्वतः ई-केवायसी पूर्ण करू शकतात. ग्राहकांना आश्वस्त करण्यासाठी आणि कोणत्याही खऱ्या ग्राहकाला कोणतीही अडचण किंवा गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी तेल कंपन्या या संदर्भात परिपत्रक देखील प्रसिद्ध करणार आहेत, अशी माहितीही पुरी यांनी दिली.

Whats_app_banner