Q3 Results News : कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत असून काल देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे निकाल जाहीर झाले. कंपनीचा निव्वळ नफा वाढल्यामुळं गुंतवणूकदार खूष झाले असून याचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले आहेत. आज सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर २ टक्क्यांहून अधिक वधारला १२९२ वर पोहोचला.
चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ७.४ टक्क्यांनी वाढून १८,५४० कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा किरकोळ व्यवसाय, टेलिकॉम क्षेत्रातील वाढती कमाई आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायाची चांगली कामगिरी यामुळं नफ्यात वाढ झाली आहे.
कंपनीनं गुरुवारी स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती दिली. त्यानुसार, कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १३.७० रुपये प्रति शेअर असा आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १७,२६५ कोटी रुपयांचा (१२.७६ रुपये प्रति शेअर) निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला १६,५६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
डिसेंबर तिमाहीत कंपनीचं करपूर्व उत्पन्न (EBITDA) ७.८ टक्क्यांनी वाढून ४८,००३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. वित्तीय खर्च सुमारे ७ टक्क्यांनी वाढ होऊनही कंपनीचं करपूर्व उत्पन्न वाढलं आहे. वित्तीय खर्च वाढण्याचं कारण वाढीव कर्ज हे आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत हे कर्ज ३.५ लाख कोटी रुपये होतं. सप्टेंबर तिमाहीत ते ३.३६ लाख कोटी रुपये आणि डिसेंबर २०२३ मध्ये संपलेल्या तिमाहीत ३.११ लाख कोटी रुपये होतं.
डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल ७.७ टक्क्यांनी वाढून २.६७ लाख कोटी रुपये झाला आहे. कंपनीची टेलिकॉम शाखा जिओचा नफा उच्च दर आणि नवीन ग्राहकांमुळं वाढला आहे. अधिक स्टोअर्स आणि ग्राहकांनी किरकोळ व्यवसायांना चालना देण्यास मदत केली. चांगली देशांतर्गत मागणी आणि वाढत्या पेट्रोकेमिकल मार्जिनमुळं तेल-रसायनांच्या व्यवसायानं चांगली कामगिरी केली आहे.
जिओ इन्फोकॉमचा निव्वळ नफा तिसऱ्या तिमाहीत २४ टक्क्यांनी वाढून ६,४७७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचा नफा २६ टक्क्यांनी वाढून ६,८६१ कोटी रुपये झाला आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स हे कंपनीच्या सर्व डिजिटल व्यवसायांचं व्यासपीठ आहे. जिओचे चारही महत्त्वाचे घटक डेटा मिनिट वापर, डेटा वापर, सरासरी प्रति वापरकर्ता महसूल आणि ग्राहक संख्येत वाढ झाली आहे. डिसेंबर २०२४ अखेर संपलेल्या तिमाहीत ग्राहकांची संख्या वाढून ४८.२१ कोटी झाली आहे. जुलै-सप्टेंबर २०२४ च्या मागील तिमाहीत ती ४७.८८ कोटी होती.
मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत हा आकडा ४७.०९ कोटी होता. प्रति वापरकर्ता सरासरी उत्पन्न (एआरपीयू) दरमहा २०० रुपयांचा टप्पा ओलांडून तिसऱ्या तिमाहीत २०३.३ रुपये झाले, तर मागील तिमाहीत १९५.१ रुपये आणि वर्षभरापूर्वी १८१.७ रुपये होते.
कंपनीची रिटेल शाखा रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर १० टक्क्यांनी वाढून ३,४५८ कोटी रुपये झाला आहे. कंपनीनं या कालावधीत ७७९ नवीन स्टोअर्स उघडले असून स्टोअर्सची संख्या १९,१०२ वर पोहोचली आहे. तर सणासुदीच्या खरेदीमुळं स्टोअरमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या २९.६ कोटींवर पोहोचली. वर्षभरापूर्वी ही संख्या २८.२ दशलक्ष होती.
रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पांचे करपूर्व उत्पन्न २.४ टक्क्यांनी वाढून १४,४०२ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. रिफायनरींनी कच्च्या तेलावर प्रक्रिया केली आणि पेट्रोकेमिकल मार्जिनमध्ये सुधारणा झाली.
इंधन रिटेल व्यवसायात जिओ-बीपीने पेट्रोल आणि डिझेलमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक तिमाही विक्री नोंदवली आहे. जिओ-बीपी ही रिलायन्सच्या ब्रिटनस्थित बीपीची संयुक्त कंपनी आहे. केजी-डी६ ब्लॉकमधून गॅसचे कमी उत्पादन आणि कोळसा खाणींमधील गॅसच्या किमतीत झालेली घसरण यामुळं कंपनीचा करपूर्व नफा तिसऱ्या तिमाहीत ४.१ टक्क्यांनी घसरून ५,५६५ कोटी रुपयांवर आला आहे.
संबंधित बातम्या