Stock Market : एक रुपयावरून ३१ वर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर; LIC कडे आहेत १० कोटी शेअर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market : एक रुपयावरून ३१ वर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर; LIC कडे आहेत १० कोटी शेअर

Stock Market : एक रुपयावरून ३१ वर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर; LIC कडे आहेत १० कोटी शेअर

Jul 30, 2024 05:45 PM IST

Stock Market news : अनिल अंबानी यांची कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स सध्या चर्चेत आहेत. रिलायन्स पॉवरचा शेअर मंगळवारी व्यवहारादरम्यान दोन टक्क्यांनी वधारून ३१.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

पावर शेयर टुडे
पावर शेयर टुडे

Reliance Power share price : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरचे शेअर्स सध्या चर्चेत आहेत. या कंपनीचा शेअर आज दोन टक्क्यांनी वधारला. याआधी सोमवारी हा शेअर ३ टक्क्यांनी वधारला होता. पाच वर्षांपूर्वी १ रुपयावर असलेला हा शेअर आज ३१.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

रिलायन्स पॉवरचे मार्केट कॅप १२,५६५.०९ कोटी रुपये असून गेल्या एका वर्षात या शेअरनं ९० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. २०२० पासून या शेअरमध्ये जवळपास २६६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. २७ मार्च २०२० रोजी या शेअरची किंमत १.५० रुपये होती. मात्र, २००८ पासून रिलायन्स पॉवरचा शेअर २७५ रुपयांवरून सध्याच्या किमतीवर घसरला आहे.

एलआयसीकडं २.५६ टक्के हिस्सा

रिलायन्स पॉवरच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार प्रवर्तकांकडं २३.२४ टक्के, तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे ६०.९९ टक्के हिस्सा आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) यांच्याकडं अनुक्रमे १२.७१ टक्के आणि ३.०६ टक्के हिस्सा आहे. रिलायन्स पॉवरमध्ये एलआयसीचा बहुसंख्य हिस्सा आहे. एलआयसीकडं रिलायन्स पॉवरचे १०,२७,५८,९३० शेअर्स म्हणजेच २.५६ टक्के हिस्सा आहे.

रिलायन्स पॉवरनं फेडलं ८०० कोटींचं कर्ज

रिलायन्स पॉवरनं नुकतंच कर्जदारांचं सर्व थकीत कर्ज फेडलं आहे आणि आता ती स्वतंत्र तत्त्वावर कर्जमुक्त कंपनी बनली आहे. रिलायन्स पॉवरवर सुमारे ८०० कोटी रुपयांचं कर्ज होतं. ते नुकतंच फेडण्यात आलं आहे. रिलायन्स पॉवरनं डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि डीबीएससह विविध बँकांशी अनेक डेट सेटलमेंट करार केले.

काय करते ही कंपनी?

रिलायन्स पॉवर लिमिटेड ही यापूर्वी रिलायन्स एनर्जी जनरेशन लिमिटेड म्हणून ओळखली जायची. ही कंपनी रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाचा एक भाग आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वीज प्रकल्प विकसित करणे, बांधणे, चालविणे आणि देखभाल करणे यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.

Whats_app_banner