JioCinema Merger news : उद्योगविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. स्टार इंडिया आणि वायकॉम १८ च्या विलीनीकरणानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आता आणखी एक मोठं पाऊल उचलणार आहे. जिओसिनेमाचं डिज्नी+हॉटस्टारमध्ये विलिनीकरण होणार आहे. त्यानंतर डिज्नी + हॉटस्टार हेच एकमेव स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म राहण्याची शक्यता असून त्यावरच सर्व प्रकारचा कंटेंट पाहता येणार आहे.
अलीकडंच अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया युनिट्सच्या नॉन-न्यूज आणि करंट अफेअर्स टीव्ही चॅनेलशी संबंधित परवाने स्टार इंडियाला हस्तांतरित करण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे. आता दोन्ही कंपन्या विलीनीकरणाच्या अंतिम टप्प्यात आहेत आणि सीसीआयच्या निर्देशांनुसार त्यांच्या व्यवसायातही काही बदल करीत आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया आणि मनोरंजन व्यवसायाची मालकी असलेल्या वायकॉम १८ मीडिया आणि डिजिटल १८ मीडियाचे स्टार इंडियामध्ये विलीनीकरण करण्याच्या योजनेला राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणानं (NCLT) ३० ऑगस्ट रोजी मंजुरी दिली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिज्नी कंपनीच्या मीडिया मालमत्तांच्या विलीनीकरणामुळं देशातील सर्वात मोठा मीडिया समूह तयार होईल. त्याचं मूल्य ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.
रिलायन्स आणि डिस्ने यांच्या विलीनीकरणानंतर २०२५ च्या आयपीएलसह इतर क्रीडा स्पर्धांच्या प्रसारणातही महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, यापुढं क्रिकेटसह इतर सर्व क्रीडा स्पर्धा जिओ सिनेमा ऐवजी Disney+ Hotstar वर पाहता येणार आहेत. सध्या भारतातील क्रिकेट सामन्यांचे डिजिटल अधिकार Jio Cinema कडं आहेत, तर Disney+ Hotstar कडे ICC स्पर्धांचे अधिकार आहेत.
वॉल्ट डिस्नेची स्टार इंडियाच्या मालकीची स्ट्रीमिंग सर्व्हिस डिज्नी+ हॉटस्टारचे गुगल प्ले स्टोअरवर ५० ० दशलक्षाहून अधिक डाऊनलोड आहेत, तर जिओसिनेमाचे १०० दशलक्ष डाउनलोड आहेत. जिओसिनेमा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचं आहे. रिलायन्सच्या वार्षिक अहवालानुसार, जिओसिनेमा महिन्याला सरासरी २२५ दशलक्ष युजर्सपर्यंत पोहोचतो. याउलट, २०२३ च्या चौथ्या तिमाहीत डिज्नी + हॉटस्टारचे महिन्याचे अॅक्टिव्ह युजर्स ३३३ दशलक्ष होते. यापूर्वी रिलायन्सच्या नियंत्रणाखालील वायकॉम १८ नं आपल्या विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं जिओसिनेमात विलीनीकरण केलं होतं. हे वूट ब्रँड प्लॅटफॉर्म होतं.
नेटफ्लिक्स आणि जपानच्या सोनी सारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी आरआयएलनं संयुक्त उपक्रमात सुमारे ११,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या संयुक्त उपक्रमाचं नेतृत्व करणार असून, उदय शंकर हे उपाध्यक्ष असतील.