Reliance Share price : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (RIL) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी गुंतवणूकदारांना खूशखबर दिली आहे. रिलायन्स आपल्या शेअरहोल्डर्सना १:१ या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भात प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
येत्या ५ सप्टेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत बोनस शेअर्सचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या फ्री कॅश रिझर्व्हमधून हे शेअर्स देण्यात येणार आहेत. कंपनीनं गुरुवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. त्यानुसार, प्रत्येक शेअरमागे आरआयएलचा एक अतिरिक्त शेअर गुंतवणूकदारांना मिळणार आहे.
बोनस शेअरच्या घोषणेनंतर गुरुवारी दिवसभरात कंपनीचा शेअर १.५५ टक्क्यांनी वधारून ३०४२.९० रुपयांवर पोहोचला. रिलायन्सनं यापूर्वी २०१७ आणि २००९ मध्ये अंदाजे १:१ या दरानं बोनस शेअर्स दिले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये आज झालेल्या तेजीनंतर हा शेअर ८ जुलै २०२४ च्या ३२१७.९० रुपयांच्या उच्चांकी पातळीपासून ४ टक्क्यांनी दूर आहे. दरम्यान, २६ ऑक्टोबर २०२३ रोजी ५२ आठवड्यांच्या नीचांकी २२२१.०५ रुपयांवरून ३७ टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये सुमारे २४ टक्के आणि या वर्षी आतापर्यंत १९ टक्के वाढ झाली आहे.
कंपनीकडून आपल्या विद्यमान शेअरहोल्डर्सना मोफत दिल्या जाणाऱ्या शेअर्सना बोनस शेअर्स म्हणतात. या शेअरसाठी गुंतवणूकदारांना पैसे मोजावे लागत नाहीत. हे शेअर देताना कंपनीकडून एक रेश्यो (गुणोत्तर) जाहीर केला जातो. उदा. १:१, १:२ अशा वेगवेगळ्या प्रमाणात हे शेअर दिले जातात. शेअरहोल्डरकडं आधीपासून असलेल्या संख्येनुसार त्याला बोनस शेअर मिळतात. गुणोत्तर १:१ असेल तर सध्या भागधारकाकडं असलेल्या संख्येइतकेच शेअर मिळतात.