नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वादळी वाढ पाहायला मिळत आहे. रिलायन्स समूहाची हाऊसिंग फायनान्स कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या शुक्रवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ४.३६ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. अनिल अंबानी सातत्याने आपले कर्ज कमी करत आहेत आणि निधी उभारणीवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्याचा परिणाम शेअर्सवर दिसून येत आहे. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. संजय पी. शिंदे यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरमध्ये गेल्या पाच दिवसांत १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सहा महिन्यांत हा शेअर ४५ टक्क्यांनी वधारला आहे. वर्षभरात हा शेअर १४० टक्क्यांपर्यंत वधारला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत १ रुपये होती. त्याचबरोबर दीर्घकाळात याचे खूप नुकसान झाले आहे. २२ सप्टेंबर २०१७ रोजी हा शेअर १०७ रुपयांवर व्यवहार करत होता. म्हणजेच या काळात 96 टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली आहे. रिलायन्स होम फायनान्सचा शेअर 9 जानेवारी 2024 रोजी 6.22 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. तर 17 ऑगस्ट 2023 रोजी हा शेअर 1.61 रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे.
रिलायन्स होम फायनान्समध्ये पब्लिक शेअरहोल्डिंग ९९.२६ टक्के आहे. तर, प्रवर्तक अनिल अंबानी कुटुंबाचा ०.७४ टक्के हिस्सा आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) सार्वजनिक भागधारकांमध्ये मोठा वाटा आहे. एलआयसीकडे रिलायन्स कंपनीचे 74,86,599 शेअर्स आहेत. हा हिस्सा सुमारे १.५४ टक्के भागभांडवलाएवढा आहे.