Share Market News In Marathi : स्मॉल कॅप स्टॉक रेडटेपच्या शेअरमध्ये आज, गुरुवार, २६ डिसेंबर रोजी ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या वाढीमुळं कंपनीच्या शेअरनं इंट्राडे व्यवहारात उच्चांकी पातळी गाठत ९१५ रुपयांवर झेप घेतली. कंपनीच्या संचालक मंडळानं घेतलेला लाभांश आणि बोनस देण्याचा निर्णय हे शेअरमधील वाढीचं कारण आहे.
रेडटेप कंपनीच्या संचालक मंडळानं आपल्या शेअरहोल्डर्सना ३:१ या प्रमाणात बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना त्यांच्या विद्यमान समभागांपैकी प्रत्येकासाठी तीन नवीन पूर्णपणे पेड अप इक्विटी शेअर्स मिळतील. एकूण ४१,४६,०५,७०० इक्विटी शेअर्स बोनस शेअर म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं शेअर बाजाराला दिली. या निर्णयाला सदस्यांची मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. कंपनीनं बोनस शेअर इश्यूची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. बोनस शेअरबरोबरच रेडटेपनं आपल्या शेअरहोल्डर्सना प्रति शेअर २ रुपये अंतरिम लाभांश देखील जाहीर केला आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाच्या सदस्यानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रति समभाग २ रुपये (१०० टक्के) अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. तसंच, कंपनीनं अंतरिम लाभांश मिळण्यास पात्र भागधारकांची निवड करण्याच्या उद्देशाने ३ जानेवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
बोनस आणि डिविडंडच्या घोषणेनंतर रेडटेपच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. बीएसईवर रेडटेपच्या शेअरचा भाव ५.२५ टक्क्यांनी वधारून ९१५ रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ९८१.८० पातळीपासून केवळ ७ टक्क्यांनी दूर आहे, तर ५२ आठवड्यांच्या नीचांकी ४५४.७५ रुपयांवरून दुपटीहून अधिक वाढला आहे. रेडटेप बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सचा भाग आहे आणि या कंपनीचं मार्केट कॅप सुमारे १२,४०० कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या