Redmi Turbo 3 Launch Date: रेडमी टर्बो ३ लवकरच चीनमध्ये लाँच होणार आहे. फोनचे प्रमुख स्पेक्स आणि डिझाइन डिटेल्स ऑनलाइन लीक झाले आहेत. आता कंपनीने फोनचे नाव आणि रिलीज डेट अधिकृतरित्या कन्फर्म केली आहे. हा फोन क्वालकॉमच्या लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसरवर चालणार आहे.
शाओमी चीनच्या वेबसाईटवरील लँडिंग पेजनुसार, रेडमी टर्बो ३ उद्या (१० एप्रिल २०२४) रोजी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता लॉन्च होणार आहे. हा फोन ब्लॅक, ग्रीन आणि गोल्डन अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरा लेन्स आणि रिंगच्या आकाराचा फ्लॅश दिसतो. उजव्या बाजूला, आपल्याला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल आढळतील.
वेइबोवरील अधिकृत पोस्टमध्ये असे दिसून आले आहे की, रेडमी टर्बो ३ मध्ये पातळ बॉर्डरसह फ्लॅट डिस्प्ले आणि फ्रंट कॅमेऱ्यासाठी एक छोटा होल-पंच कटआऊट असेल. इतर अधिकृत घोषणांमध्ये म्हटले आहे की, फोन ७.८ मिमी जाड आणि १७९ ग्रॅम वजनाचा असेल आणि टॉप मॉडेलमध्ये १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज मिळेल. यात शाओमीचा हायपरओएस प्री-इन्स्टॉल करण्यात येणार आहे.
रेडमी टर्बो ३ रेडमी पॅड प्रोसह लाँच केला जाईल, जो तीन रंगांमध्ये येईल आणि यात १२.१ इंचाचा २.५ के डिस्प्ले आणि १० हजार एमएएचची मोठी बॅटरी असेल. हा टॅबलेट २०२२ मध्ये सादर करण्यात आलेल्या रेडमी पॅड सीरिजमध्ये जोडला जाणार आहे. दोन्ही डिव्हाइस शाओमीच्या हायपरओएसवर चालतील. रेडमी टर्बो ३ च्या लँडिंग पेजवर शाओमीच्या ओपन-बॅक हेडफोनच्या लाँचिंगचे संकेत देखील देण्यात आले आहेत.
मागील लीक्सनुसार, रेडमी टर्बो ३ मध्ये ६.७८ इंचाची १४४ हर्ट्झ १.५ के ओएलईडी स्क्रीन आणि ८० वॅट फास्ट चार्जिंगसह ६ हजार एमएएच बॅटरी असू शकते. पोको एफ ६ या नावाने तो जागतिक स्तरावर प्रदर्शित केला जाऊ शकतो, अशीही अटकळ बांधली जात आहे.
संबंधित बातम्या