Redmi Note 14 Pro Series: रेडमी नोट १४ प्रो+ स्मार्टफोन उद्या (२६ सप्टेंबर) लॉन्च होणार आहे. लॉन्चिंगपूर्वी कंपनी या फोनच्या काही फीचर्सची पुष्टी करत आहे. रेडमीने मंगळवारी पोस्टर शेअर करत फोनचा प्रोसेसर आणि बॅटरी कन्फर्म केली. आता कंपनीने पोस्टर शेअर करत आपल्या कॅमेरा स्पेसिफिकेशनला दुजोरा दिला आहे. कंपनीच्या नोट सीरिजचा हा पहिलाच फोन असेल, जो टेलिफोटो कॅमेऱ्यासोबत येणार आहे. कंपनीने शेअर केलेल्या पोस्टरनुसार फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ओमनीव्हिजन लाइट फ्यूजन ८०० कॅमेरा मिळेल. हा कॅमेरा ओआयएस सपोर्ट, १३.२ ईव्ही नेटिव्ह डायनॅमिक रेंज आणि एफ/१.६ अपर्चरसोबत येईल.
या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सरही मिळणार आहे. हा टेलिफोटो सेन्सर एफ/२,० अपर्चर आणि २.५ एक्स ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल. फोनमध्ये अल्ट्रावाइड अँगल लेन्सदेखील दिला जाऊ शकतो. परंतु, त्याचे स्पेसिफिकेशन डिटेल्स अद्याप समोर आलेले नाहीत. रेडमीनेही या फोनच्या डिस्प्लेला दुजोरा दिला आहे.
रेडमीनुसार हा फोन कर्व्ह्ड एज डिझाइनसह १.५ के ओएलईडी डिस्प्लेसह येईल. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास २ प्रोटेक्शन देणार आहे. याशिवाय फोनमध्ये तुम्हाला आयपी ६९ डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट रेटिंगही पाहायला मिळेल. फोनच्या डिस्प्ले साईजबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, हा फोन ६.६७ इंचाच्या डिस्प्लेसह येऊ शकतो, जो १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल, असे मानले जात आहे.
हा फोन १६ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायात येऊ शकतो. प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ एस जेन ३ देणार आहे. या फोनची बॅटरी ६२०० एमएएच असेल, जी ९० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ओएसबद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित हायपरओएसवर काम करेल. हा फोन स्टार सँड ग्रीन, मिरर पोर्सेलिन व्हाईट आणि मिडनाइट ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. रेडमीचा हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच करण्यात येणार आहे.
कंपनीने लाँचिंगपूर्वी या फोनसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉरंटी प्रोग्रॅम सादर केला आहे, ज्याला ‘किंग कॉंग गॅरंटी सर्व्हिस’ असे म्हटले जात आहे. या सेवेअंतर्गत वर्षभरात फोनमध्ये बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्याऐवजी ग्राहकाला नवा फोन दिला जाणार आहे.