King Kong Guarantee Service: रेडमी नोट १४ प्रो सीरिजचे फोन पुढील आठवड्यात लाँच होणार आहेत. या सीरिजमध्ये रेडमी नोट १४ प्रो आणि रेडमी नोट १४ प्रो+ या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीने लॉन्चिंगपूर्वी या फोनसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉरंटी प्रोग्रॅम सादर केला आहे, ज्याला ‘किंग काँग गॅरंटी सर्व्हिस’ असे म्हटले जात आहे. या सेवेअंतर्गत वर्षभरात फोनमध्ये बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्याऐवजी थेट बदलून दिला जाईल. तर, रेडमीच्या 'किंग काँग गॅरंटी सर्व्हिस’मध्ये ग्राहकांना नेमके कोणते फायदे मिळतील, हे जाणून घेऊयात.
किंग काँग गॅरंटी सर्व्हिसमध्ये ग्राहकांना पाच विशिष्ट फायदे मिळणार आहे, सर्वात प्रथम म्हणजे, एका वर्षाची एक्सीडेन्टल वॉटर डॅमेज वॉरंटी मिळत आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. कारण, बहुतेक कंपन्या पाण्यामुळे खराब झालेला फोन दुरुस्त करुन देत नाही. याशिवाय, फोनवर एक वर्षाची स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटीही मिळत आहे. म्हणजेच वर्षभरात फोनची स्किन तुटली तर कंपनी तो मोफत बदलून देणार आहे.
कंपनीच्या नव्या वॉरंटीमध्ये ग्राहकांना पाच वर्षांची बॅटरी वॉरंटी देत आहे. बॅटरीची लाइफ ८० टक्क्यांहून कमी झाल्यानंतर कंपनी विनामूल्य बदलून देईल. ही एक उत्तम ऑफर आहे, विशेषत: बहुतेक फोनच्या बॅटरी २-३ वर्षांच्या आत खराब होण्यास सुरवात होते.
याव्यतिरिक्त किंग काँग गॅरंटीमध्ये ग्राहकांना ३६५ डे रिप्लेसमेंट विदआउट रिपेयर सुविधा मिळते. पहिल्या वर्षाच्या आत तुमच्या फोनमध्ये हार्डवेअरमध्ये बिघाड झाला तर कंपनी फोन रिपेअर करण्याऐवजी ग्राहकाला नवा फोन देईल.
ग्राहकांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या या तपशीलांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. परंतु रिपोर्टनुसार किंग काँग गॅरंटी सर्व्हिस अॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त ५९५ युआन म्हणजेच ७००० हजार रुपये मोजावे लागू शकतात.
रेडमी नोट १४ प्रो सीरिजच्या संपूर्ण माहितीसाठी आम्हाला पुढील आठवड्यात अधिकृत लॉन्चची वाट पाहावी लागेल. लाँचिंगनंतरच आम्हाला किंग काँग गॅरंटी सर्व्हिसची किंमत आणि विशेष कॉन्फिगरेशनची अचूक माहिती मिळेल.