stock market : लिस्टिंगनंतर दोन आठवड्यांतच 'या' शेअरनं केला नवा विक्रम; गुंतवणूकदार झाले मालमाल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market : लिस्टिंगनंतर दोन आठवड्यांतच 'या' शेअरनं केला नवा विक्रम; गुंतवणूकदार झाले मालमाल

stock market : लिस्टिंगनंतर दोन आठवड्यांतच 'या' शेअरनं केला नवा विक्रम; गुंतवणूकदार झाले मालमाल

Published Oct 18, 2024 06:01 PM IST

Diffusion Engineers Share Price : डिफ्युजन इंजिनीअर्स लिमिटेडचा आयपीओ लागलेले व त्यानंतरही शेअर होल्ड करून असलेले गुंतवणूकदार दोन आठवड्यातच मालामाल झाले आहेत.

multibagger stock prakash industries
multibagger stock prakash industries

Stock Market Updates : अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या डिफ्युजन इंजिनीअर्सनं कमाल केली आहे. बाजारातील मागील काही दिवसांतील चढ-उतारांवर मात करत या शेअरनं वरच्या दिशेनं प्रवास सुरू ठेवला आहे. डिफ्युजनचा आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे दोन आठवड्यांतच दुप्पट झाले आहेत.

 आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, आज डिफ्यूजन इंजिनिअर्सचा शेअर एनएसईवर १३.११ टक्क्यांनी वधारून ३३८.२० रुपयांवर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर ३५१.४५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. शेअरच्या किंमतीचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. याच महिन्यात ४ ऑक्टोबर २०२४ रोजी ही कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली होती.

डिफ्यूजन इंजिनिअर्सचा शेअर १६८ रुपयांच्या इश्यू प्राइसपेक्षा १५ टक्क्यांहून अधिक वाढीसह सूचीबद्ध झाला होता. बीएसईवरील इश्यू प्राइसपेक्षा ११.९० टक्क्यांनी वधारून हा शेअर १८८ रुपयांवर लिस्ट झाला. नंतर तो १७.४७ टक्क्यांनी वधारून १९७.३५ रुपयांवर पोहोचला. एनएसईवर तो १५.१७ टक्क्यांनी वधारून १९३.५० रुपयांवर पोहोचला. नंतर तो २०.९३ टक्क्यांनी वधारून २०३.१७ रुपयांवर पोहोचला.

दोन आठवड्यांत पैसे दुप्पट

डिफ्युजनच्या आयपीओसाठी १५९ ते १६८ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. हा शेअर १६८ रुपयांवर इश्यू झाला होता. आज त्याची किंमत ३३८.२० रुपये आहे. आकडेमोड केल्यास इश्यू प्राइसवर शेअर्स मिळालेल्या गुंतवणूकदारांचा नफा दुप्पट झाला आहे.

आयपीओला मिळाला होता दणदणीत प्रतिसाद

कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला होता. शेवटच्या दिवशी डिफ्युजन इंजिनिअर्स लिमिटेडचा आयपीओ ११४.५० पट सब्सक्राइब झाला. किरकोळ श्रेणीत ८५.६१ पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत ९५.७४ पट आणि उच्च बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत २०७.६० पट आयपीओ सब्सक्राइब झाला होता. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ४७.१४ कोटी रुपये उभे केले आहेत. 

काय करते कंपनी?

डिफ्युजन इंजिनिअर्स कोअर इंडस्ट्रीजसाठी वेल्डिंग कंझ्युमेबल्स तयार करणे, वियर प्लेट्स आणि वियर पार्ट्स आणि अवजड अभियांत्रिकी मशिनरी तयार करण्याच्या व्यवसायात आहे.

शेअर बाजार सावरला!

शेअर बाजारात सातत्याने होत असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला. बीएसई सेन्सेक्स २१८.१४ अंकांनी म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी वधारून ८१,२२४.७५ रुपयांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०४.२० अंकांनी वधारून २४८५४.०५ अंकांवर बंद झाला.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner