Zerodha's Nithin Kamath : ऑनलाइन ब्रोकरेज प्लॅटफॉर्म झिरोधाचे सहसंस्थापक व सीईओ नितीन कामत हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. उद्योग व अर्थविश्वाशी संबंधित अनेक गोष्टींवर आपली मतं मोकळेपणानं मांडतात. आता त्यांनी शेअर बाजाराविषयी बोलताना गुजराती समाजाबद्दल केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. अर्थात, हे विधान गुजराती समाजाचं महत्त्व अधोरेखित करणारं आहे.
नितीन कामत यांच्या विश्लेषणानुसार, भारतीय शेअर बाजारातील इक्विटी डिलिव्हरी ट्रेडमध्ये या मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांचा वाटा ८० टक्के आहे. तो बुडू द्या. मुळात खरा पैसा गुज्जूंकडे आहे,' असं कामत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये थट्टेनं म्हटलं आहे.
कामत यांचे हे विधान म्हणजे भारताच्या आर्थिक बाजारपेठेत गुजराती समाजाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणारं आहे. अहमदाबाद आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये व्यवसाय आणि व्यापारात सक्रिय असलेला समाज अशी गुजराती समाजाची ओळख आहे. साहजिकच पैसे असल्यामुळं शेअर बाजारावरही त्यांची छाप आहे.
कामत यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये इक्विटी ट्रेड डिलिव्हरीमध्ये मुंबईचा वाटा ६४.२८ टक्के होता, तर याच कालावधीत इक्विटी डिलिव्हरी ट्रेडमध्ये अहमदाबाद शहराचा वाटा १७.५३ टक्के होता.
सप्टेंबर महिन्यात एका पोस्टमध्ये नितीन कामत यांनी शेअर बाजारातील गुजरातच्या योगदानाचा उल्लेख केला होता. तेव्हा त्यांनी आयपीओमध्ये सर्वाधिक सुमारे ४० टक्के सहभाग घेतल्याबद्दल राज्याचं कौतुक केलं होतं.
मात्र कामत यांच्या पोस्टमध्ये एक विरोधाभास अधोरेखित झाला आहे. कामत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एकूण नोंदणीकृत गुंतवणूकदारांमध्ये गुजरातचा वाटा केवळ ८ टक्के आहे आणि हा शेअर घसरत चालला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशनंतर गुजरातमध्ये सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार आहेत, तर नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येत घट झाल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे.
गुजरातचा नोंदणीकृत गुंतवणूकदार आधार आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात तो १२ टक्के होता. तर, २०१४-१५ या आर्थिक वर्षात तो ११ टक्के होता आणि २००९-१० या आर्थिक वर्षात १३ टक्के होता.
नोंदणीकृत गुंतवणूकदारांची सर्वाधिक टक्केवारी असलेल्या महाराष्ट्रातही घसरण झाली आहे. झिरोधाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या चालू आर्थिक वर्षात १७ टक्के आहे, तर २०१९-२० या आर्थिक वर्षात ही संख्या १९ टक्के, २०१४-१५ आणि २००९-१० या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात २० टक्के होती.
कामत यांच्या माहितीला दुजोरा देत सोशल मीडिया युजर्सनी जोखीम घेण्याच्या गुजराती समाजाच्या स्वभावाचं कौतुक केलं आहे. फिनटेक प्लॅटफॉर्म क्रेड अँड फ्रीचार्जचे संस्थापक कुणाल शहा यांनी 'स्कॅम 1992' या वेब सीरिजमधील एका देशव्यापी प्रसिद्ध डायलॉगचा हवाला देत 'रिस्क है तो इश्क है' असं म्हटलं आहे.
ट्रस्टस्कोअरच्या संस्थापक श्वेता म्हणाल्या, 'गुंतवणुकीसाठी संयम आणि विपुल साधनसंपत्तीची गरज असते. या गुणांचा विचार केल्यास गुजराती समुदाय भारतातील इतर समाजाच्या तुलनेत ठळकपणे उठून दिसतो. त्यांचा धोरणात्मक दृष्टिकोन, कौशल्य आणि चिकाटीमुळं गुंतवणुकीच्या क्लिष्टतेवर मात करण्यात ते यशस्वी होतात.
संबंधित बातम्या