Budget 2024 for Real Estate : मध्यमवर्गीयांना स्वत:ची घरे खरेदी करता यावीत किंवा बांधता यावीत यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकार नवीन गृहनिर्माण योजना सुरू करणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली.
भाड्याची घरे, झोपडपट्ट्या, चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गातील पात्र कुटुंबांना स्वत:ची घरे खरेदी किंवा बांधण्यासाठी मदत करण्यासाठी आमचं सरकार एक योजना सुरू करणार आहे, असं सीतारामन म्हणाल्या.
पंतप्रधान आवास (ग्रामीण) योजनेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचीही त्यांनी माहिती दिली. 'भारताच्या ग्रामीण भागात ३ कोटी घरे बांधण्याचं लक्ष्य सरकार लवकरच गाठेल. तसंच, याच योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांत आणखी २ कोटी घरे बांधण्यासाठी सरकार मदत करेल, असंही अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं.
कोविडमुळं अनेक अडथळे येऊनही असूनही पंतप्रधान आवास योजनेची (ग्रामीण) अंमलबजावणी सुरू आहे. आम्ही तीन कोटी घरांचे उद्दिष्ट जवळपास गाठलं आहे. कुटुंबांची संख्या वाढल्यानं निर्माण होणारी गरज भागविण्यासाठी पुढील पाच वर्षांत आणखी दोन कोटी घरं बांधण्याचं काम हाती घेतलं जाईल, असं त्या म्हणाल्या.
या उपक्रमांमुळं राहण्यायोग्य घरांची उणीव भरून काढता येईल,' असं कोलिअर्स इंडियाचे निवासी व्यवहार सेवा व्यवस्थापकीय संचालक रविशंकर सिंह यांनी सांगितलं.
२०२४ पर्यंत सर्व बेघर कुटुंबे आणि ग्रामीण भागातील कच्च्या आणि मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्यांना मूलभूत सुविधांसह पक्के घर उपलब्ध करून देणं हा पीएमएवाय-जीचं उद्दिष्ट आहे.