RBI Monetary policy : तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर अनेक गोष्टी आता सोप्या होऊ लागल्या आहेत. जगातील अनेक गोष्टी एका क्लिकवर आलेल्या असताना बँकेत टाकलेला चेक क्लिअर होण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागायची. आता मात्र ही रखडपट्टी थांबणार आहे. रिझर्व्ह बँकेनं त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार आता काही तासांत चेक क्लिअर होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) चेक क्लिअरिंगसाठी लागणारा वेळ काही तासांपर्यंत कमी करण्यासाठी आणि या प्रक्रियेशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी पावलं उचलण्याची घोषणा केली आहे. सध्या धनादेश जमा होण्यापासून रक्कम येईपर्यंत दोन दिवसांचा कालावधी लागतो. व्यावसायिकांना यामुळं बराच त्रास सहन करावा लागतो. परंतु नव्या प्रणालीत चेक जमा केल्यानंतर काही तासांतच तो 'क्लिअर' केला जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी चालू आर्थिक वर्षाचा तिसरे पतधोरण जाहीर केलं. चेक क्लिअरिंग सुरळीत करण्यासाठी, सेटलमेंट जोखीम कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी चेक ट्रंकेशन सिस्टमच्या (CTS) विद्यमान कार्यपद्धतीत बदल प्रस्तावित आहेत. सध्याच्या सीटीएस व्यवस्थेत बॅचमध्ये प्रक्रिया करण्याऐवजी कामकाजाच्या वेळेत सातत्यानं क्लिअरिंग केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
नव्या व्यवस्थेत चेक स्कॅन केला जाईल, सादर केला जाईल आणि काही तासांत क्लिअर केला जाईल. यामुळं सध्याच्या दोन दिवसांच्या (टी प्लस १) तुलनेत काही तासांत चेक क्लिअरिंग होईल. या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केली जातील, असं दास यांनी सांगितलं. याशिवाय बँकांनी दर पंधरवड्याला आपल्या ग्राहकांची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना द्यावी, अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं केल्या आहेत. सध्या हा अहवाल महिन्यातून एकदा दिला जातो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सलग नवव्यांदा पतधोरण जैसे थे ठेवलं आहे. वेगानं सुरू असलेल्या आर्थिक घडामोडी आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयनं व्याजदरात कपात करणं टाळलं आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. मे २०२२ पासून सलग सहा वेळा २५० बेसिस पॉईंट्सनं दरवाढ केल्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दरवाढीचं हे चक्र थांबविण्यात आलं होतं. ते आजही कायम आहे.