भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दास यांना अॅसिडिटीचा त्रास होत होता, त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काही तासांत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. काळजीचं कारण नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या वतीनं देण्यात आली आहे.
अपोलो रुग्णालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शांतनिकांत दास यांची काल रात्री तपासणी करण्यात आली. त्यांना अॅसिडिटी झाल्याचं निदान झालं आणि त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ दुसऱ्यांदा वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याचं वृत्त आहे. दास यांना मुदतवाढ मिळाल्यास ते १९६० नंतर सर्वात जास्त काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहतील.
डिसेंबर २०१८ मध्ये पदभार स्वीकारलेल्या दास यांनी रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यातील तणावाच्या काळात रिझर्व्ह बँकेला स्थिर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उत्तम समन्वयासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली आरबीआयनं अनेक आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांचा सध्याचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत आहे. अलीकडच्या दशकांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची पाच वर्षांची मुदत ओलांडलेल्या दास यांना १९४९ ते १९५७ दरम्यान ७.५ वर्षे गव्हर्नर म्हणून काम केलेल्या बेनेगल रामाराव यांच्याच श्रेणीत ठेवण्यात येणार आहे.