cash deposits trough UPI : एटीएम व डिजिटल पेमेंटच्या सुविधा आल्यापासून वेगवान व सुरळीत झालेल्या बँकिंग सेवेला आता आणखी गती मिळणार आहे. आता यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून कॅश डिपॉझिट करता येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. UPI द्वारे रोख रक्कम भरण्याची सुविधा देण्याचा आरबीआयचा विचार आहे, असं दास यांनी सांगितलं. ही सेवा नेमकी कशी असेल याचा तपशील त्यांना सांगितला नसला तरी कॅशलेस डिपॉझिटच्या दिशेनं रिझर्व्ह बँकेचं हे दुसरं मोठं पाऊल असल्याचं मानलं जात आहे. सध्या केवळ डेबिट कार्डच्या माध्यमातून कॅशलेस डिपॉझिट करता येते.
एटीएम (ATM) मध्ये UPI वापरून कार्डलेस पैसे काढण्याचा अनुभव लक्षात घेता आता UPI वापरून कॅश डिपॉझिट मशीन्स (CDMs) मध्ये पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ही सुविधा सुरू झाल्यास ग्राहकांसाठी डिपॉझिट करणं सोपं जाईल. तसंच, बँकांना रोख रकमेचं व्यवस्थापन करणं अधिक सोप्पं होईल, असा विश्वास शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकांमध्ये कॅश डिपॉझिट मशीनचा वापर केला जात असल्यामुळं ग्राहकांची सोय वाढली आहे. तसंच, बँकांमध्ये रोकड ठेवण्याचा आणि सांभाळण्याचा ताणही कमी झाला आहे. UPI ची लोकप्रियता आणि स्वीकारार्हता बघता कार्डलेस डिपॉझिटचा पर्याय अधिक फायदेशीर ठरेल.
तज्ज्ञांच्या मते, जे ग्राहक रोख रक्कम घेऊन कॅश डिपॉझिट मशीनपर्यंत पोहोचतात त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. सर्वसाधारणपणे ग्राहक रोख रक्कम घेतात आणि कॅश डिपॉझिट मशीनद्वारे दुसऱ्याच्या बँक खात्यात जमा करतात. ही प्रक्रिया UPI द्वारे झाल्यास ग्राहकांना रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही, असा तज्ञांचा अंदाज आहे. तुमच्या कॅश डिपॉझिट मशीनवर एक स्कॅनर येईल आणि आवश्यक पडताळणी केल्यानंतर, तुम्ही स्कॅन करून पैसे जमा करू शकाल.
कॅश डिपॉझिट मशीनमध्येही अनेकदा वैध नोटा स्वीकारल्या जात नसल्याचं दिसून येतं. त्यामुळं पुन्हा पुन्हा डिपॉझिट करणं किंवा नोट बदलणं हे ग्राहकांसाठी आव्हान असतं. UPI सुविधा सुरू झाल्यास ग्राहकांची ही अडचण दूर होणार आहे.