Share Market Updates : रेमंड समूहाची कंपनी रेमंड लाइफस्टाइलनं शेअर बाजारात धमाका केला आहे. रेमंड लाइफस्टाइलचा आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. मुंबई शेअर बाजारात (BSE) हा शेअर तब्बल ९९.५ टक्के प्रीमियमसह ३,००० रुपयांवर, तर, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) हा शेअर ९३ टक्के प्रीमियमसह ३०२० रुपयांवर लिस्ट झाला.
बीएसईवर रेमंड लाइफस्टाइल कंपनीच्या शेअरची मूळ किंमत १५०३.३ रुपये प्रति शेअर होती. तर, एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची मूळ किंमत १५६२.६ रुपये होती. प्रत्यक्षात हा शेअर मूळ किंमतीपेक्षा खूपच वाढला आहे.
गौतम सिंघानिया यांच्या नेतृत्वाखालील रेमंड लिमिटेड या कंपनीनं आपला कन्झ्युमर लाइफस्टाइल व्यवसाय वेगळा केला होता. विभाजनानंतर रेमंड लाइफस्टाइलचे लग्न आणि पारंपरिक पोषाख, गारमेंट्स निर्यात, ब्रँडेड कपडे आणि वस्त्रोद्योग असे चार प्रमुख विभाग असतील. डीमर्जरनंतर रेमंड लाइफस्टाइलची मूळ कंपनी असलेल्या रेमंड लिमिटेडच्या शेअरहोल्डर्सना प्रत्येक ५ शेअरमागे ४ शेअर देण्यात आले. डीमर्जरनंतर रेमंड समूहातील रेमंड आणि रेमंड लाइफस्टाइल या दोन कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत.
रेमंड लाइफस्टाइलचा शेअर ९० टक्क्यांहून अधिक वाढीसह बीएसई आणि एनएसई दोन्ही एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाला आहे. धडाकेबाज सुरुवातीनंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर रेमंड लाइफस्टाइलचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून २८५० रुपयांवर आला. तर, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (NSE) रेमंड लाइफस्टाइलचा शेअर ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटसह २८६९ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचं मार्केट कॅप १७४७८.९९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
मूळ कंपनी रेमंड लिमिटेडच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. रेमंड लिमिटेडचा शेअर गुरुवारी २ टक्क्यांहून अधिक घसरणीसह २०३०.४० रुपयांवर व्यवहार करत आहे. रेमंड लिमिटेडच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ३४९३ रुपये आहे.