ratan tata will : दिग्गज उद्योगपती व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता रतन टाटा यांची शेवटची इच्छा पूर्ण करावी लागणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, रतन टाटा यांनी इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी वकील दरायस खंबाटा, त्यांचे निकटवर्तीय मेहली मिस्त्री, सावत्र बहिणी शिरीन आणि डेना जिजीभॉय यांची नियुक्ती केली आहे.
हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४ च्या अहवालानुसार, टाटा सन्समध्ये रतन टाटा यांची ०.८३ टक्के भागीदारी होती. त्यांची नेटवर्थ ७९०० कोटी रुपये आहे. रतन टाटा यांच्या संपत्तीपैकी तीन चतुर्थांश संपत्ती टाटा सन्समधील त्यांच्या शेअर्सशी संबंधित आहे. याशिवाय रतन टाटा यांनी ओला, पेटीएम, ट्रॅक्सन, फर्स्टक्राय, ब्लूस्टोन, कारदेखो, कॅशकारो, अर्बन कंपनी, अपस्टोक्स अशा जवळपास २ डझन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. याशिवाय मुंबईतील कुलाबा आणि अलिबाग इथं त्यांची घरे आहेत. रतन टाटा यांच्या इच्छापत्राचा तपशील खासगी आहे.
रतन टाटा यांनी आपल्या इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी चार जणांची नियुक्ती केली आहे. ते रतन टाटा यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. मेहली हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. टाटा सन्समध्ये दोन्ही ट्रस्टची मिळून ५२ टक्के हिस्सेदारी आहे. तर, टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा एकूण ६६ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. टाटा समूहातील सूचीबद्ध कंपन्यांमध्ये टाटा सन्सचं बाजारमूल्य १६.७१ लाख कोटी रुपये आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, दरायस खंबाटा यांनी रतन टाटा यांना इच्छापत्र तयार करण्यात मदत केली आहे. गेल्या वर्षी त्यांनी टाटा कुटुंबीयांच्या दोन प्रमुख ट्रस्टवर विश्वस्त म्हणून पुनरागमन केलं आहे. यापूर्वी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव टाटा ट्रस्ट सोडलं होतं.
संबंधित बातम्या