Shantanu Naidu : रतन टाटा यांचे तरुण मित्र शंतनू नायडू यांच्यावर टाटा समूहात मोठी जबाबदारी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Shantanu Naidu : रतन टाटा यांचे तरुण मित्र शंतनू नायडू यांच्यावर टाटा समूहात मोठी जबाबदारी

Shantanu Naidu : रतन टाटा यांचे तरुण मित्र शंतनू नायडू यांच्यावर टाटा समूहात मोठी जबाबदारी

Feb 04, 2025 04:45 PM IST

Shantanu Naidu in Tata Motors : प्रख्यात उद्योजक दिवंगत रतन टाटा यांचे सहाय्यक व मित्र शंतनू नायडू यांची टाटा मोटर्समध्ये मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Shantanu Naidu : रतन टाटा यांचा तरुण मित्र शंतनू नायडू याच्यावर टाटा समूहात मोठी जबाबदारी
Shantanu Naidu : रतन टाटा यांचा तरुण मित्र शंतनू नायडू याच्यावर टाटा समूहात मोठी जबाबदारी

Tata Motors News : प्रख्यात उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांच्या सोबत सावलीसारखे वावरणारे त्यांचे तरुण मित्र शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. टाटा मोटर्समध्ये महाव्यवस्थापक आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शंतनू नायडू (Shantanu Naidu) यांनी स्वत: लिंक्डइनवर याबाबत माहिती दिली आहे. नव्या नियुक्तीबद्दल शंतनू यांनी आनंद व्यक्त केला आहे. 'टाटा मोटर्समध्ये स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह्सचे जनरल मॅनेजर म्हणून माझा प्रवास सुरू करताना मला आनंद होत आहे. एक काळ होता जेव्हा माझे वडील टाटा मोटर्सच्या प्लाण्टमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पँट घालून घरी जात असत. मी खिडकीत बसून त्यांची वाट पाहत असे. त्या दिवसांची आठवण मला आज होतेय. माझ्या नव्या नियुक्तीमुळं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे, असं शंतनू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रतन टाटा यांचे सहाय्यक म्हणून काम

शंतनू नायडू यांनी २०१४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी आणि २०१६ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए पूर्ण केलं. २०१८ मध्ये शंतनू यांनी रतन टाटा यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. शंतनू आणि रतन टाटा यांच्या मैत्रीचे किस्से खूप लोकप्रिय आहेत. एकदा रतन टाटांनी नायडूंसोबत आपला वाढदिवस साजरा केला होता. याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता.

…आणि शंतनू टाटांच्या जवळ आले!

ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनीअर शंतनू नायडू यांनी बेघर कुत्र्यांना भरधाव कारपासून वाचवण्यासाठी २०१४ मध्ये एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं होतं. प्राणीप्रेमी रतन टाटा यांनी शंतनूच्या कार्याची दखल घेतली. टाटांनी या प्रकल्पात गुंतवणूक केली आणि त्यानंतर ते शंतनूचे मार्गदर्शक, बॉस आणि जवळचे मित्र बनले.

रतन टाटा यांनीही गुडफेलो या स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली होती. शंतनू नायडू यांनी २०२१ मध्ये भारतात एकटे राहणाऱ्या वृद्धांना मदत करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला होता. रतन टाटा यांनी गुडफेलोमधील आपला हिस्सा सोडून दिला होता. इतकंच नव्हे, तर आपल्या इच्छापत्रात नायडू यांचं शैक्षणिक कर्जही माफ केलं, असं म्हटलं जातं.

Whats_app_banner