भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना पाळीव प्राण्यांविषयी असलेलं प्रेम जगविख्यात आहे. ते पाळीव प्राण्यांना कुटुंबाचा एक सदस्य मानतात. या पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात एक अत्याधुनिक रुग्णालय असावं अशी इच्छा रतन टाटा अनेक वर्षांपासून बाळगून होते. परंतु अखेर वयाच्या ८६ व्या वर्षी टाटांचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. टाटा ट्रस्टतर्फे भारतातलं पहिलं अत्याधुनिक स्मॉल एनिमल हॉस्पिटल मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात सुरू करणार आलं आहे. ९८ हजार चौरस फूट जागेत बांधलेल्या ५ मजल्यांच्या या रुग्णालयात २०० प्राण्यांची क्षमता आहे. या रुग्णालयात दर्जेदार सेवेसाठी प्रशिक्षित पशुतज्ञ, नर्सेस आणि तंत्रज्ञ यांच्याद्वारे २४ तास सुविधा पुरवली जाणार आहे. हे रूग्णालय पुढील महिन्यात म्हणजे मार्च २०२४ ला सुरू होणार आहे.
या रुग्णालयाबद्दल बोलताना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा म्हणाले, ‘पाळीव पशू हे आपल्या कुटुंबाचा भाग असतात. त्यांचा जीव प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाचा असतो. मी माझ्या आजूबाजूला पाहतो तेव्हा मला असं लक्षात येतं की भारतात पाळीव प्राण्यांसाठी फार कमी सुविधा आहेत. भारतासारख्या मोठ्या देशात पाळीव प्राण्यांची संख्या खूप मोठी आहे. आपल्याला प्राण्यांचा जीव वाचवून त्यांना चांगले जीवनमान उपलब्ध करून देण्याकरिता सुविधा का नसावी, याचं मला आश्चर्य वाटलं. प्रत्येक प्राण्याला करूणा, प्रेम आणि मानवी दृष्टीकोनातून उपचार देण्याची ‘स्मॉल एनिमल हॉस्पिटल’ उभारण्यामागची प्रेरणा आहे.’ असं टाटा म्हणाले.
या रुग्णालयाबद्दल बोलताना डॉ. थॉमस हीथकोट, चीफ व्हेटर्नरी ऑफिसर म्हणाले,'भारतातील एक आघाडीची सेवाभावी संस्था म्हणून आम्ही मानवी आरोग्य आणि पशु आरोग्य यांच्यातील आंतरसंबंध जाणतो. देशात पशु आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हे रुग्णालय टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून हॉस्पिटलमध्ये प्राण्यांच्या आरोग्याविषयी सल्ला तसेच निदान व उपचार देण्यात येणार आहे. येथे पशुंच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी उत्तम दर्जाची नर्सिंग सेवा देण्यात येणार आहे. आगामी काही महिन्यांमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाच्या पशुवैद्यकीय संस्था असलेल्या रॉयल व्हेटरनरी कॉलेज, लंडनसोबत प्रशिक्षण उपक्रम चालवण्याचे नियोजन करणार आहे.'
हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने टाटा ट्रस्टच्या एडव्हान्स्ड व्हेटरनरी केअर फॅसिलिटीला (एसीव्हीएफ) महालक्ष्मी येथे दिलेल्या एक एकर जमिनीवर उभारण्यात आले आहे. हे उदघाटन टप्प्याटप्याने होणार आहे. पहिल्या दिवशी इमर्जन्सी अँड क्रिटिकल केअर- 24x7 चाचणी आणि उपचार सेवा; आंतररूग्ण आणि आयसीयू युनिट्स (आयसोलेशन युनिट्ससह); सर्जिकल सेवा (सॉफ्ट टिश्यू सर्जरी, ऑर्थोपेडिक्स इत्यादी); फार्मसी सेवा; निदान- रेडिओलॉजी आणि इमेजिंग (MRI, X-ray, CT Scan आणि USG) यांच्यासारख्या सहाय्यभूत सेवा, प्रयोगशाळा- हेमाटोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सायटोलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, हिस्टो पॅथॉलॉजी आणि एनेस्थेशिया सुरू केल्या जाणार आहे.
रुग्णालयात डॉ. थॉमस हीथकोट यांच्या नेतृत्वाखाली ६६ कौशल्यपूर्ण डॉक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ आणि पेट केअर सहाय्यकांची टीम काम करणार आहे.
संबंधित बातम्या