Ratan Tata Health news : देशातील प्रसिद्ध उद्योगपती व टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळं त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्यावर स्वत: टाटा यांनी खुलासा केला आहे.
टाटा उद्योगसमूह आणि त्याचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्याबद्दल भारतीय जनमानसात एक आदराचं स्थान आहे. त्यामुळं ८६ वर्षीय रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त आल्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं. त्यामुळं रतन टाटा यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट करून स्वत: तब्येतीची माहिती दिली आहे.
माझ्याविषयीच्या काळजीबद्दल आभार, असं म्हणत रतन टाटा यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘माझ्या तब्येतीविषयी पसरलेल्या अफवा आणि सुरू असलेल्या चर्चेची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. या चर्चा निराधार आहेत हे मला आपल्याला सांगायचं आहे. माझं वय आणि त्या वयोमानामुळं अधूनमधून उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळं मी सध्या रुग्णालयात गेलो आहे. काही तपासण्या करून घेत आहे. चिंतेचं कुठलंही कारण नाही. माझी तब्येत उत्तम आहे. कृपया लोकांनी आणि मीडियानं कुठल्याही प्रकारची चुकीची महिती पसरवणं टाळावं.’