दिग्गज कंपन्यांचे शेअर आज माना टाकत असताना 'हा' चिमुकला शेअर रॉकेटच्या वेगानं वाढतोय!-rama steel tubes share surge more than 18 percent while stock market is falling ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  दिग्गज कंपन्यांचे शेअर आज माना टाकत असताना 'हा' चिमुकला शेअर रॉकेटच्या वेगानं वाढतोय!

दिग्गज कंपन्यांचे शेअर आज माना टाकत असताना 'हा' चिमुकला शेअर रॉकेटच्या वेगानं वाढतोय!

Sep 06, 2024 12:28 PM IST

Rama steel share price : शेअर बाजार आज कोसळलेला असताना रामा स्टील ट्यूब्स या स्मॉल कॅप कंपनीचा शेअर मात्र उसळला आहे. या शेअरमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Share market crash : दिग्गज कंपन्यांचे शेअर आज माना टाकत असताना हा चिमुकला शेअर रॉकेटच्या वेगानं वाढतोय
Share market crash : दिग्गज कंपन्यांचे शेअर आज माना टाकत असताना हा चिमुकला शेअर रॉकेटच्या वेगानं वाढतोय

Stock Market Updates : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजार कोसळला असताना व दिग्गज कंपन्यांचे शेअर माना टाकत असताना रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड या कंपनीचा शेअर रॉकेटच्या वेगानं वाढत आहे. आज हा शेअर १८ टक्क्यांनी वाढला असून मागच्या तीन दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वधारला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांची चंगळ झाली आहे.

स्मॉल-कॅप स्टॉक रामा स्टील ट्यूब्स (RSTL) च्या शेअरनं एनएसईवर आज नवा उच्चांक नोंदवला आहे. हा शेअर १६.८३ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीनं हरित आणि अक्षय्य उर्जेसाठी Onix Renewable सोबत धोरणात्मक सहकार्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

आज सकाळपासून शेअरची वाटचाल कशी?

आज सकाळच्या सत्रात हा शेअर १४.७३ रुपयांवर खुला झाला आणि काही वेळातच शेअरनं आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला. गुरुवारच्या सत्रात शेअरला अप्पर सर्किट लागलं होतं. सध्या हा शेअर १८.१७ टक्क्यांनी वाढून १६.३९ रुपयांवर ट्रेड करत आहे.

रामा स्टील ट्यूब्स लिमिटेडनं हरित आणि अक्षय्य ऊर्जेसाठी Onyx Renewable या कंपनीसोबत धोरणात्मक सहकार्य करार केला  आहे. कंपनीनं नुकतीच ही माहिती स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. या माहितीनुसार, कंपनी सौर प्रकल्पांसाठी स्टील स्ट्रक्चर्स आणि सिंगल ॲक्सिस ट्रॅकर्स पुरवणार आहे. भविष्यात ड्युअल ॲक्सिस ट्रॅकर्सचा विस्तार करण्याची योजना आहे. या घडामोडीमुळं गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढला आहे.

या सहकार्यामुळं आरएसटीएलचा हरित ऊर्जा क्षेत्रात प्रवेश झाला आहे. कंपनीनं विशेष स्टील स्ट्रक्चर्स आणि ट्रॅकर ट्यूब विकसित करून आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. ते ग्रीनफिल्ड सौर प्रकल्पांसाठी आधारस्तंभ ठरणार आहे. सध्या ओनिक्स रिन्युएबलचे ६०० मेगावॅटचे सौर प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. येत्या काळात त्यात २२०० मेगावॅट इतक्या क्षमतेच्या प्रकल्पांची भर पडणार आहे.

कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा किती?

जून २०२४ अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, रामा स्टील ट्यूब्समध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ५६.३३ टक्के इतका आहे. कंपनीचं बाजार भांडवल सध्या २५०० कोटींच्या पुढं पोहोचलं आहे. मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जून २०२४ तिमाहीत कंपनीचा महसूल १५८.३० कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा २.५८ कोटी रुपये होता.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)