Small Cap company : स्मॉलकॅप कंपनी रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. सोमवारी बीएसईवर रामा स्टील ट्यूब्सचा शेअर १० टक्क्यांनी वधारून १३.४७ रुपयांवर पोहोचला. या वाढीमागे एक महत्त्वाचं कारण आहे.
कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसायासाठी एक नवीन युनिट सुरू केलं आहे. ओनिक्स आयपीपी प्रायव्हेट लिमिटेड असं या युनिटचं नाव असून रामा स्टील ट्यूब्सची ही पूर्ण मालकीची नवीन कंपनी आहे. या कंपनीचं अधिकृत भागभांडवल १ लाख रुपये आहे.
हरित आणि नुतनीकृत ऊर्जा व्यवसायात उतरणार
रामा स्टील ट्यूब्सनं एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की प्रस्तावित कंपनी हरित ऊर्जा आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात व्यवसाय करेल. रामा स्टील ट्यूब्सनं नुकतीच ओनिक्स रिन्यूएबल्स लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. सौर प्रकल्पांसाठी स्टील स्ट्रक्चर आणि सिंगल-अॅक्सिस ट्रॅकर्सपुरवठ्यासाठी ही भागीदारी होती. तसेच, भविष्यात ड्युअल-अॅक्सिस ट्रॅकर्समध्ये विस्तार करण्याची योजना आहे. रामा स्टील ट्यूब्सनं सौर प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या विशेष स्टील स्ट्रक्चर आणि ट्रॅकर ट्यूब विकसित केल्या आहेत.
रामा स्टील ट्यूब्सनं गेल्या दोन वर्षांत दोन वेळा आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स भेट दिले आहेत. कंपनीनं जानेवारी २०२३ मध्ये ४:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक एका शेअरमागे ४ बोनस शेअर्सचं वाटप केलं होतं. कंपनीनं मार्च २०२४ मध्ये २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. म्हणजेच प्रत्येक शेअरमागे २ बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीनं मार्च २०१६ मध्ये ४:१ या प्रमाणात बोनस शेअर्सची भेट दिली होती. रामा स्टील ट्यूब्सनं शेअरचं विभाजनही केलं आहे. कंपनीने ५ रुपयांच्या अंकित मूल्याच्या शेअरची प्रत्येकी १ रुपयांच्या अंकित मूल्याच्या ५ शेअर्समध्ये विभागणी केली आहे. यापूर्वी रामा स्टील ट्यूब्सने मार्च २०१६ मध्ये शेअरचं विभाजन केलं होतं.
रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १७.५१ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ९.९१ रुपये आहे.
संबंधित बातम्या