share market news updates : सुमारे सव्वा दोन हजार कोटींचं बाजार भांडवल असलेल्या राम स्टील ट्यूब्सच्या शेअरनं सध्या धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडत आहेत. मागच्या केवळ दोन दिवसांत हा शेअर २८ टक्क्यांनी वधारला आहे.
स्टील ट्यूब्सची निर्मिती करणाऱ्या या कंपनीच्या शेअरमध्ये आजही तेजी कायम आहे. आज दुपारी १ वाजता कंपनीचा शेअर १९.२० टक्क्यांनी वधारून १३.७८ ट्रेड करत आहे. रामा स्टील ट्यूब्सनं हरित आणि अक्षय्य ऊर्जेसाठी Onyx Renewable या कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. कंपनीनं नुकतीच ही माहिती स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. या करारानुसार कंपनी सौर प्रकल्पांसाठी स्टील स्ट्रक्चर्स आणि सिंगल ॲक्सिस ट्रॅकर्स पुरवणार आहे. भविष्यात ड्युअल ॲक्सिस ट्रॅकर्सचा विस्तार करण्याची योजना आहे. या बातमीनंतर गुंतवणूकदारांचा रस कंपनीमध्ये वाढला आहे.
आज सकाळी एनएसईवर हा पेनी शेअर (Penny Stock) ११.९० रुपयांच्या वाढीसह उघडला. यानंतर तो मागील बंद किमतीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढून १३.७८ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला.
रामा स्टील ट्यूब्सचे शेअर्स ४ सप्टेंबर रोजी १० टक्क्यांनी वाढले होते. रामा स्टील ट्यूब्सनं स्वत:च्या पूर्ण मालकीची रामा डिफेन्स प्राइव्हेट लिमिटेड ही उपकंपनी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी स्थापन केली आहे. २ सप्टेंबर रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून त्यांना इनकॉर्पोरेशन प्रमाणपत्र मिळालं आहे. या उपकंपनीचं अधिकृत भांडवल १५ लाख रुपये आणि सदस्यता घेतलेलं भांडवल १ लाख रुपये आहे.
रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणार आहे. यात व्यापार, आयात, निर्यात, उत्पादन, असेम्ब्लिंग, संरक्षण उपकरणं, शस्त्रे, दारूगोळा, स्फोटकं आणि संबंधित लष्करी आणि सुरक्षा हार्डवेअर इत्यादींचा समावेश आहे.
जून २०२४ अखेरपर्यंत रामा स्टील ट्यूब्समध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ५६.३३ टक्के इतका होता. कंपनीचं मार्केट कॅप २००० कोटींच्या मागेपुढे आहे. बीएसई डेटानुसार, एप्रिल-जून २०२४ तिमाहीत कंपनीचा महसूल १५८.३० कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा २.५८ कोटी रुपये होता.