Adani Group : अदानींची चौकशी करणारे सेबीचे प्रमुख एनडीटीव्हीचे डायरेक्टर कसे? - राहुल गांधी
Rahul Gandhi questions SEBI : सेबीनं केलेल्या अदानी समूहाच्या चौकशीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Rahul Gandhi on SEBI : ओसीसीआरपी या विदेशी संस्थेनं अदानी समूहावर केलेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या आरोपांचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन अदानींवर तोफ डागली आहे. तसंच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. हिंडनबर्गच्या आरोपानंतर सेबीनं केलेल्या अदानींच्या चौकशीवरही राहुल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सुमारे आठ महिन्यांपूर्वी हिंडनबर्ग रिसर्च संस्थेनं अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. विरोधकांनी संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशीची मागणी लावून धरली होती. केंद्र सरकारनं ती मान्य केली नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सेबीनं अदानी समूहाची चौकशी सुरू केली होती. सेबीच्या चौकशीत अदानी समूहाला क्लीन चिट देण्यात आल्याचं समजतं.
संरक्षण क्षेत्रातील अदानींच्या कंपनीत चिनी व्यक्तीची गुतंवणूक, राहुल गांधींची चौकशीची मागणी
अदानी समूहावर आज नव्यानं झालेल्या आरोपांच्या निमित्तानं राहुल यांनी हाच धागा पकडत सेबीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अदानी समूहाच्या चौकशीची जबाबदारी असलेले सेबीचे प्रमुख आज अदानींच्या ताब्यात असलेल्या एनडीटीव्हीचे संचालक आहेत. याचा अर्थ हे एक नेटवर्क आहे. सेबीचे प्रमुख क्लीन चिट देतात आणि लगेच अदानींच्या कंपनीत संचालक बनतात. आंतरराष्ट्रीय प्रकरण आहे. शेअरचा भाव फुगवला जात आहे आणि त्यातून येणाऱ्या पैशातून देशातील संपत्ती विकत घेतली जात आहे. या सर्वांबद्दल पंतप्रधान मोदी काहीच का बोलत नाहीत, हा खरा प्रश्न आहे, असं राहुल गांधी म्हणाले. सीबीआय आणि ईडी या संस्था गौतम अदानी यांची चौकशी का करत नाही, असा प्रश्नही राहुल यांनी केला.
देशाची प्रतिष्ठा पणाला लागलीय…
'देशाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही दिवसांनी भारतात जी २० शिखर परिषद होत आहे. देशात भ्रष्टाचार नाही. संपूर्ण देशाचा कारभार पारदर्शक आहे असं आपण जगभर सांगत आहोत. अशा वेळी हे प्रकरण पुढं आलं आहे. एक अब्ज रुपये देशाबाहेर जातायत. शेअरचे भाव कृत्रिमरित्या फुगवले जात आहेत. त्यातून देशातील संपत्ती खरेदी केली जात आहे. या सगळ्यांची चौकशी करून पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले.