मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर 'दाल-चावल' फंड निवडा! काय आहे हा प्रकार? वाचा!

Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर 'दाल-चावल' फंड निवडा! काय आहे हा प्रकार? वाचा!

Jul 05, 2024 12:05 PM IST

Dal Chawal mutual Fund : एडलवाइजच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी 'दाल-चावल' फंडाची संकल्पना मांडली आहे.

Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय तर 'डाळ-भात' फंड निवडा! काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया
Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय तर 'डाळ-भात' फंड निवडा! काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया (File Image)

Dal Chawal mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गोंधळून जाणाऱ्या व भावनेच्या भरात चुकीची गुंतवणूक करणाऱ्यांना एडलवाइजच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता (Radhika Gupta) यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ८० टक्के फंड हे 'डाळ-भात' फंड असले पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी फॉलोअर्सना म्युच्युअल फंडातील सुरक्षित गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केलं आहे. ‘एक्स’वर त्यांनी एकामागोमाग एक अनेक पोस्ट टाकल्या आहेत. एका गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ पाहिल्यानंतर त्यांनी इतरांना सावध केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ज्या गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ पाहिला, तो महिन्याला २७ हजार रुपये म्युच्युअल फंडात गुंतवतो आहे. त्यानं ३१ फंड घेतले आहेत, त्यातील तबब्ल १५ फंड एखाद्या सेक्टरपुरता मर्यादित आहेत. आजच्या काळात अशी संकुचित गुंतवणूक धोक्याची ठरू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये ८० टक्के वाटा हा 'दाल-चावल' फंडाचा असावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

दाल-चावल फंडाविषयी अधिक विस्तारानं सांगताना त्या म्हणाल्या, माझ्या बोलण्याचा अर्थ कोणतंही एका सेक्टर किंवा कल्पनेशी संबंधित नसलेले फंड. हे फंड हायब्रीड, डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड असावेत. ते अ‍ॅक्टिव्ह आहेत की पॅसिव्ह (इंडेक्स किंवा अन्य) यानं काहीच फरक पडत नाही. ते व्यापक आणि १२ महिने चालणारे असावेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

डाळ-चावल फंड म्हणजे काय?

राधिका गुप्ता यांच्या मतानुसार, 'ऑल वेदर' आणि ‘विविध क्षेत्रांशी संबंधित असलेरे ब्रॉड बेस्ड म्युच्युअल फंड हे ’दाल-चावल' फंड असतात. बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज आणि आक्रमक हायब्रीड प्रकारचे फंड, ज्यात फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप, लार्ज आणि मिड कॅप असू शकतात. हे कायमस्वरूपी चालणारे फंड असतात. केवळ एका सीझनमध्ये चालणारे किंवा एकाच सेक्टरवर अवलंबून असणारे फंड टाळावेत.

दाल-चावल फंडात गुंतवणूक का करावी?

दाल-चावल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास मार्केट सायकलचा मोठा फटका बसत नाही. एखाद्या सेक्टरमध्ये मंदी असली तर दुसऱ्या सेक्टरमधील तेजी परिस्थिती सावरून घेते. याउलट संकुचित क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक असल्यास थेट फटका बसतो. संकुचित प्रकारातील फंड बाजाराच्या अनुषंगानं परतावा देतात. बाजाराच्या एकूण रिटर्न्सपेक्षा जास्त परतावा ते क्वचितच देतात.

सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका ही जुनी म्हण आहे. वैविध्यपूर्ण आणि व्यापक गुंतवणूक तोट्याचा धोका कमी करते, असं राधिका गुप्ता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सेक्टरल फंडांच्या परताव्याचा एक चार्टही त्यांनी शेअर केला आहे.

WhatsApp channel