Dmart Share Price News in Marathi : आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल येऊ लागले आहेत. या निकालांचं प्रतिबिंब शेअर बाजारातही उमटू लागलं आहे. तिमाहीच्या निकालांमुळं आज राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्टचा (डीमार्ट) शेअर जोरदार चर्चेत आहे. हा शेअर आज एका क्षणी तब्बल १५ टक्क्यांपर्यंत उसळला.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीचं कामकाजातून मिळालेलं स्वतंत्र उत्पन्न १५,५६५.२३ कोटी रुपये आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीतील १३२४७.३३ रुपयांच्या तुलनेत ते १७.४९ टक्क्यांनी अधिक आहे. हा आकडा मागील तीन डिसेंबर तिमाहीतील महसुलापेक्षाही अधिक आहे.
कंपनीनं या तिमाहीत १० स्टोअर्सची भर घातली असून सप्टेंबर तिमाहीतील ३७७ स्टोअर्सवरून कंपनीची एकूण स्टोअर संख्या ३८७ वर पोहोचली आहे.
एव्हेन्यू सुपरमार्ट हा राधाकिशन दमानी पोर्टफोलिओ स्टॉक आहे. सप्टेंबर २०२४ तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, दमानी यांच्याकडं कंपनीतील ३७.२२ टक्के हिस्सा आहे. दमानी हे कंपनीचे प्रवर्तक म्हणूनही वर्गीकृत आहेत. सप्टेंबर तिमाहीअखेर त्यांच्याकडं २४.२२ कोटी शेअर्स होते.
दमदार कमाईच्या घोषणेनंतर बीएसईवर एव्हेन्यू सुपरमार्टच्या शेअरचा भाव १५ टक्क्यांनी वधारून ४,१६०.४० रुपयांवर पोहोचला. बीएसईवर हा शेअर ३,७९० रुपयांवर उघडला. ही वाढ मागील बंदच्या तुलनेत ४.७६ टक्क्यांनी अधिक होती. त्यानंतर लगेचच तो ४१६०.४० रुपयांवर पोहोचला.
आजच्या प्रचंड तेजीनंतरही एव्हेन्यू सुपरमार्टच्या शेअरची किंमत सप्टेंबर २०२४ मधील ५,४८४ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपासून अजूनही ३२ टक्क्यांनी दूर आहे. मात्र, डिसेंबर २०२४ मधील ५२ आठवड्यांच्या नीचांकी ३,४०० रुपयांच्या तुलनेत हा शेअर २२ टक्क्यांनी वधारला आहे.
ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या (MOSL) माहितीनुसार, डीमार्टनं वार्षिक १७.५ टक्के वाढ नोंदवून १५६ अब्ज रुपयांवर नेली आहे. वार्षिक वाढीच्या आमच्या अंदाजापेक्षा ही चांगली कामगिरी आहे. तुलनेनं कमकुवत दुसऱ्या तिमाहीनंतर महसुली वाढ १७ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
स्टोअर्समध्ये झालेली वाढ ही डीमार्टच्या वाढीचं प्रमुख कारण आहे, असं एमओएसएलनं म्हटले आहे. मार्च तिमाहीपर्यंत आणखी १८ स्टोअर्स सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यामुळं या आर्थिक वर्षात भर पडलेल्या एकूण स्टोअर्सची संख्या ४० होईल. ब्रोकरेजनं डीमार्टवर बाय रेटिंग दिलं असून टार्गेट प्राइस ५,३०० रुपये आहे.
संबंधित बातम्या