Quant Mutual Fund : क्वांट म्युच्युअल फंडात तुमची गुंतवणूक असेल तर हे काळजीपूर्वक वाचा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Quant Mutual Fund : क्वांट म्युच्युअल फंडात तुमची गुंतवणूक असेल तर हे काळजीपूर्वक वाचा

Quant Mutual Fund : क्वांट म्युच्युअल फंडात तुमची गुंतवणूक असेल तर हे काळजीपूर्वक वाचा

Jun 24, 2024 12:54 PM IST

quant mutual fund front running case : क्वांट म्युच्युअल फंडाविरोधात सेबीनं केलेल्या कारवाईमुळं गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

Quant Mutual Fund : क्वांट म्युच्युअल फंडात तुमची गुंतवणूक असेल तर हे काळजीपूर्वक वाचा
Quant Mutual Fund : क्वांट म्युच्युअल फंडात तुमची गुंतवणूक असेल तर हे काळजीपूर्वक वाचा

'फ्रंट रनिंग'च्या संशयावरून सेक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी (SEBI)नं क्वांट म्युच्युअल फंडाच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळं सुमारे ७९ लाख किरकोळ गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. सेबीनं फंड हाऊसच्या मुंबई मुख्यालयात व अन्य ठिकाणांवर झाडाझडती आणि जप्तीची कारवाई केली आहे. क्वांट डीलर्स आणि असोसिएट्सची चौकशी करण्यात आली आहे.

क्वांट म्युच्युअल फंडाची सेबीकडून सुरू असलेली चौकशी ही गंभीर बाब असली तरी फंड हाऊस सेबीशी पूर्ण सहकार्य करत आहे. क्वांट म्युच्युअल फंड सेबीनं दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक पावलं उचलत आहे. त्यामुळं किरकोळ गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं बोललं जात आहे.

क्वांट म्युच्युअल फंडाची वाढ

क्वांट म्युच्युअल फंडच्या अंतर्गत २७ फंडांचं व्यवस्थापन केलं जातं. त्यांची एकूण उलाढाल (AUM - Assets under management) ८४,००० कोटी रुपये आहे आणि त्यात ७९ लाख फोलिओ आहेत. फंडाच्या वाढीचा अंदाज त्याच्या ऐतिहासिक डेटावरून लावला जाऊ शकतो. मागील काही वर्षांत एयूएम आणि फोलिओची संख्या या दोन्हीमध्ये वाढ झाली आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये या फंडाची एयूएम १६६ कोटी रुपये होती आणि फोलिओची संख्या १९,८२९ होती. तर, डिसेंबर २०२० मध्ये एकूण संपत्ती व्यवस्थापनाचा आकडा ४८८ कोटी इतका वाढला आणि फोलियाची संख्या देखील जवळजवळ तीन पटीनं वाढून ५८,७३७ वर पोहोचली.

डिसेंबर २०२१ मध्ये व्यवस्थानांतर्गत मालमत्ता ५,४५५ कोटी आणि फोलिओ ६,७९,५५९ वर पोहोचला. यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये फोलिओ १९,३९,२२० फोलिओसह १७,२२८ कोटी रुपयांवर पोहोचले. मे २०२४ मध्ये व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता ८४ हजार कोटींच्या पुढं केली आणि फोलिओची संख्या ७९,००,००० वर पोहोचली.

फ्रंट रनिंग आणि त्याचे परिणाम

वैयक्तिक फायद्यासाठी क्लायंटच्या गोपनीय माहितीचा गैरवापर करून फ्रंट-रनिंग होत असेल तर ते बाजारातील निष्पक्षता कमी करते. अशा परिस्थितीत क्वांट म्युच्युअल फंडाच्या युनिट धारकांनी खालील गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

फंड मॅनेजमेंट : फ्रंट-रनिंगचे आरोप खरे असले तरी त्याचा फंडाच्या अंतर्गत मालमत्तेवर किंवा व्यवस्थापन धोरणावर परिणाम होतोच असं नाही. फंडाच्या निव्वळ मालमत्ता मूल्यावर (NAV) या शुल्कांचा थेट परिणाम होत नाही.

तरलता आणि एक्झिट लोड : आमच्या योजनांमध्ये लिक्विडीटीचा प्रॉब्लेम नाही हे क्वांट म्युच्युअल फंडानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं युनिट्स विकून बाहेर पडण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांनी एक्झिट लोड आणि संभाव्य कराचा विचार करावा.

जोखीम मूल्यांकन : किरकोळ गुंतवणूकदारांनी फंडातून बाहेर पडण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्याऐवजी आपली जोखीम आणि आपण घेतलेल्या योजनेच्या कामगिरीचं मूल्यांकन केलं पाहिजे.

दीर्घकालीन विश्वासार्हता : क्वांट म्युच्युअल फंडाची दीर्घकालीन विश्वासार्हता धोक्यात असू शकते, तर तात्काळ आर्थिक परिणाम कमी असू शकतो.

कोणते आहेत फंड?

क्वांट म्युच्युअल फंड अंतर्गत संदीप टंडन हे अनेक योजना चालवतात. त्यात २४०० कोटी रुपयांचा क्वांट मल्टी ॲसेट फंड, ६,२७२ कोटी रुपयांचा क्वांट फ्लेक्सी कॅप फंड, २,४०९ कोटींचा क्वांट क्वांटल फंड आणि १,८०८ कोटींचा क्वांट व्हॅल्यू फंड यासह अनेक फ्लॅगशिप योजनांचं व्यवस्थापन करतात. या व्यतिरिक्त १,१६८ कोटींच्या क्वांट लार्ज कॅप फंडाचा यात समावेश आहे.

क्वांट डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंडाचा आकार १,१४८ कोटी रुपये आहे तर क्वांट बिझनेस सायकल फंडाचा आकार १,२७७ कोटी आहे. याशिवाय, क्वांट बीएफएसआय फंड ५६० कोटी रुपये, क्वांट हेल्थकेअर फंड २८७ कोटी, क्वांट मॅन्युफॅक्चरिंग फंड ७८७ कोटी, क्वांट मोमेंटम फंड १,९२० कोटी, क्वांट कमोडिटी फंड ३६८ कोटी, क्वांट कंझम्पशन फंड २६२ कोटी आणि ८८४ कोटींच्या क्वांट पीएसयू फंडाचा देखील यात समावेश आहे.

फ्रंट रनिंगचे हे प्रकरण पहिलेच नाही!

म्युच्युअल फंड उद्योगात फ्रंट रनिंगच्या आरोप-प्रत्यारोपांची ही पहिलीच घटना नाही. या आधी कोण-कोणत्या फंडावर फ्रंट रनिंगचे आरोप झाले आहेत, पाहूया…

आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड (एप्रिल २०२४): सेबीनं चार संस्थांना ३ कोटींचा दंड ठोठावून आणि सहा महिन्यांच्या स्थगिती देऊन हे प्रकरण निकाली काढले.

ॲक्सिस म्युच्युअल फंड (मार्च २०२३): सेबीनं वीरेश जोशी आणि इतर २० जणांवर बंदी घातली आणि ३०.५ कोटींचा नफा जप्त केला.

ड्यूश म्युच्युअल फंड (डिसेंबर २०२१): फंड व्यवस्थापक आकाश सिंघानिया आणि त्याच्या आई-वडिलांनी ५ कोटी रुपयांचा दंड भरून हे प्रकरण निकाली काढले.

एचडीएफसी एएमसी (सप्टेंबर २०१९): दोन संस्थांनी १० कोटी रुपये भरल्यानंतर १२ वर्षे जुनं हे प्रकरण मिटलं.

 

फ्रंट रनिंग थांबवण्यासाठी काय करतेय सेबी?

सेबीनं एप्रिल २०२४ मध्ये म्युच्युअल फंड नियमांमध्ये सुधारणांना मंजुरी दिली. फ्रंट रनिंग आणि फसवे व्यवहार रोखण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करणं हा त्याचा उद्देश आहे.

Whats_app_banner