QR कोड स्कॅन करतांना रहा सावधान; नाही तर क्षणात होईल बँक खाते रिकामे, सायबर फसवणुकीचा नवा फंडा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  QR कोड स्कॅन करतांना रहा सावधान; नाही तर क्षणात होईल बँक खाते रिकामे, सायबर फसवणुकीचा नवा फंडा

QR कोड स्कॅन करतांना रहा सावधान; नाही तर क्षणात होईल बँक खाते रिकामे, सायबर फसवणुकीचा नवा फंडा

Dec 05, 2024 08:36 AM IST

QR scratch card scams : बक्षिसं, कूपन कोड किंवा सवलतीचे आमिष दाखवून अनेक इंटरनेट युजर्ससोबत होत असलेला मोठा स्कॅम उघड झाला आहे. क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून ही फसवणूक केली जात आहे.

QR कोड स्कॅन करतांना रहा सावधान; नाहीतयार क्षणात होईल बँक खाते रिकामे, सायबर फसवणुकीचा नवा फंडा
QR कोड स्कॅन करतांना रहा सावधान; नाहीतयार क्षणात होईल बँक खाते रिकामे, सायबर फसवणुकीचा नवा फंडा

QR scratch card scams : जगात सध्या डिजीटल पेमेंट करण्यावर भर दिला जात आहे. भारत डिजीटल पेमेंट करण्यात जगातील आघाडीचा देश आहे. इंटरनेट व डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंग आज सहज सोपी झाली आहे. मात्र, या सोबतच अनेक घोटाळे देखील समोर येत आहे. सायबर चोरट्यांनी नागरिकांच्या फसवणुकीसाठी विविध मार्ग अवलंबत असल्याचं पुढं आलं आहे.

सायबर चोरटे या नव्या मार्गांचा अवलंब करत नागरिकांची बँक खाती हॅक करून त्यांची रक्कम लुटत आहेत. नवीन क्यूआर स्कॅम घोटाळ्यामुळे अनेकांची बँक खाती नकळत रिकामी केली जात आहे. या स्कॅममध्ये आरोपी क्यूआर कोड स्कॅन करायला सांगतात. या स्कॅन द्वारे त्यांची वैयक्तिक माहिती चोरून त्यांचे बँक खाते रिकामे करण्यात येते.

क्यूआर स्क्रॅच कार्ड घोटाळ्याची अनेक प्रकरणे रोज उघडकीस येत आहेत. सायबर चोरटे बऱ्याच नागरिकांना प्रलोभनं देऊन ही फसवणूक करत आहेत. भेटवस्तू, सूट किंवा कूपनचे आमिष दाखवून त्यांना क्यूआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडलं जात आहे. यानंतर स्कॅमर्स नागरिकांची माहिती हॅक करून त्यांच्या बँकेतील रक्कम लंपास करत आहेत. घोटाळ्याची ही पद्धत सोपी आहे. अनेक नागरिक या घोटाळ्याला बळी पडत आहेत. त्यामुळे स्कॅन करतांना सावध राहून डिजीटल पेमेंट करणे गरजेचे आहे.

काय आहे क्यूआर स्क्रॅच कार्ड घोटाळा ?

युजर्सला सर्वप्रथम एक ईमेल किंवा मेसेज पाठवला जातो. यात काही बक्षीस दिले जात असल्याचे आमिष दाखवले जाते. याशिवाय अनेकवेळा फोन करून स्कॅमर्स स्वतःला अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे कर्मचारी असल्याचा दावा करून कंपनी स्पेशल डिस्काउंट, कूपन कोड किंवा डिस्काऊंट देत असल्याचं सांगतात. या बक्षीस किंवा सवलतीचा लाभ घेण्यासाठी युजरला क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते.

कोड स्कॅन केल्यानंतर युजरला फेक वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं जातं, जिथे त्याला बरीच वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती विचारली जाते. बँक कार्ड नंबर किंवा खात्याशी संबंधित माहिती मिळवत घोटाळेबाज सहजपणे बँक खात्यात प्रवेश करून काही संज्ञाच्या आत रक्कम लंपास करतात.

या पद्धतीने फसणवुक टाळा

कोणत्याही अज्ञात ईमेल, मेसेज किंवा कॉलवर विश्वास ठेवू नका. याशिवाय केवळ अधिकृत कंपनीने दिलेल्या बक्षीसावर दावा करा आणि मेसेज, ईमेल किंवा कॉलवर दिलेले बक्षीस मिळवण्यासाठी कोणतीही वेगळी स्टेप फॉलो करू नका. तसेच, आपली वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नका. कारण त्याचा वापर आपल्याला हानी पोहोचविण्यासाठी केला जाऊ शकतो. स्वत: सुरक्षित रहा आणि या घोटाळ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इतरांना जागरूक करा.

Whats_app_banner