stock market updates : एक छोटी गोष्टही चित्र कसं पालटू शकते याची प्रचिती सध्या पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरमधील वाढीमुळं येत आहे. मल्टिप्लेक्स स्टॉक पीव्हीआर आयनॉक्सचे शेअर्स गेल्या चार दिवसांपासून सातत्यानं तेजीत आहेत. 'स्त्री २' या सिनेमाला मिळालेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या तेजीला कारणीभूत ठरला आहे.
बॉलिवूड स्टार राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरची भूमिका असलेल्या ‘स्त्री २’ या चित्रपटाला चांगलं यश मिळालं आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. प्रदर्शनानंतरच्या एका आठवड्यातच चित्रपटानं २५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअरवर दिसत आहे. आज इंट्राडे व्यवहारात कंपनीचा शेअर २ टक्क्यांनी वधारला आणि १५२९ रुपयांवर पोहोचला. याआधी मंगळवारी या शेअरमध्ये ४ टक्क्यांची तेजी दिसून आली होती.
ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसनं पहिल्या तिमाहीत कमकुवत कामगिरी करूनही पीव्हीआर आयनॉक्सबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. हा शेअर १,७०९ रुपयांपर्यंत जाईल असा विश्वास ब्रोकरेज फर्मनं व्यक्त केला आहे. पुढचे काही दिवस सणासुदीचे आणि सुट्टीचे असल्यानंही ब्रोकरेज फर्म आशावादी आहे.
आयसीआयसीआय डायरेक्टनं पीव्हीआर आयनॉक्स शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. स्त्री २ ची मजबूत सुरुवात शेअरला एक वेगळा बूस्टर देऊ शकते. यातून गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकेल, असं आयसीआयसीआय डायरेक्टनं म्हटलं आहे.
समीक्षकांनी गौरवलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यावर पीव्हीआर आयनॉक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. कंपनीसाठी ही स्ट्रॅटेजी अत्यंत यशस्वी ठरली आहे. अलीकडंच साजिद अलीचा लैला मजनूचा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटानं त्याच्या मूळ लाइफटाइम बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकलं. याआधी इम्तियाज अलीचे जब वी मेट आणि रॉकस्टार सारखे सिनेमेदेखील असेच यशस्वी ठरले होते.
'स्त्री २' हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'स्त्री' या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. स्त्री २ मध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, तमन्ना भाटिया आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री २ या चित्रपटानं अनेक विक्रम केले आहेत. Secnalic.com दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटानं २५० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच तो ३०० कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा आहे.