PVR Inox ltd share price : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना जोडीच्या 'पुष्पा' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कल्ला केल्यानंतर आता या सिनेमाचा सिक्वल येत आहे. 'पुष्पा २' विषयी चित्रपट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपट रिलीज होण्याआधीच अॅडव्हास बुकिंग १०० कोटींवर गेलं आहे. त्याचा थेट फायदा पीव्हीआर आयनॉक्स या शेअरला होणार आहे.
येत्या ५ डिसेंबरला 'पुष्पा २' चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे. अवघ्या ४८ तासांत चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग १०० कोटींच्या जवळपास पोहोचलं आहे. हे अॅडव्हान्स बुकिंग १५० कोटी रुपयांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा ब्रोकरेज हाऊस यूबीएसला आहे. साहजिकच, पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडला 'पुष्पा २' मधून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचं प्रतिबिंब आत्ताच शेअरच्या किंमतीत उमटलं आहे. कंपनीच्या शेअरमध्ये आज जवळपास २ टक्क्यांची वाढ झाली आहे. या शुक्रवारी पुष्पा 2 सिनेमा घराघरांत धडकत आहे.
पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचा शेअर आज तेजीसह १५८६.५० रुपयांच्या पातळीवर उघडला. काही काळानंतर कंपनीचा शेअर १.८० टक्क्यांच्या वाढीसह १६०३.०५ रुपयांच्या पातळीवर पोहोचण्यात यशस्वी झाला. ब्रोकरेज हाऊस यूबीएसचा असा विश्वास आहे की पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे शेअर्स २००० रुपयांच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, येस सिक्युरिटीजनं शेअरला बाय टॅग दिला आहे. ब्रोकरेज हाऊसनं १९८० रुपयांचं टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे.
पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचा शेअर दोन वर्षांत १५.८० टक्क्यांनी घसरला आहे. तर गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ८.१५ टक्क्यांची घसरण झाली आहे. पोझिशनल इन्व्हेस्टर्सच्या दृष्टिकोनातून चांगली बातमी म्हणजे गेल्या ६ महिन्यांत शेअरच्या किंमतीत २०.३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १८२९ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १२०३.७० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १५,६९६.२८ कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या