Share Market Updates : पंजाब नॅशनल बँकेने (PNB) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत दमदार नफा कमावला आहे. पंजाब नॅशनल बँकेचा निव्वळ नफा सप्टेंबर २०२४ तिमाहीत २.५ पटीने वाढून ४३०३.५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत पंजाब नॅशनल बँकेला १७५६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरमध्ये सोमवारी चांगली तेजी दिसून आली. दिवसभराच्या व्यवहारात बँकेचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून १०१.९५ रुपयांवर पोहोचला. दिवसअखेर बँकेचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून ९८.६५ रुपयांवर बंद झाला.
चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न १०,५१७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर ५.९९ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत पंजाब नॅशनल बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न ९९२३ कोटी रुपये होते. पंजाब नॅशनल बँकेला चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत २९,८७५ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते २६,३५५ कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर व्याज उत्पन्नात १३ टक्के वाढ झाली आहे.
पंजाब नॅशनल बँकेचा सकल एनपीए जुलै-सप्टेंबर २०२४ तिमाहीत ४७,५८२ कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो ५१,२६३ कोटी रुपये होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत एकूण एनपीए ६५,५६३ कोटी रुपये होता. टक्केवारीचा विचार केल्यास सप्टेंबर २०२४ तिमाहीत एनपीए ४.४८ टक्के आहे. याच वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो ४.९८ टक्के होता. मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत तो ६.९६ टक्के होता.
पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरमध्ये गेल्या दोन वर्षांत १२९ टक्के वाढ झाली आहे. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी पंजाब नॅशनल बँकेचा शेअर ४३.०५ रुपयांवर होता. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी बँकेचा शेअर ९८.६५ रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरमध्ये ३५ टक्के वाढ झाली आहे. बँकेच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १४२.९० रुपये आहे. तर, बँकेच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ६७.३४ रुपये आहे.
संबंधित बातम्या