मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO news : पुणे ई स्टॉक ब्रोकिंगच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी, उद्या शेवटचा दिवस

IPO news : पुणे ई स्टॉक ब्रोकिंगच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी, उद्या शेवटचा दिवस

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 11, 2024 11:42 AM IST

Pune e stock broking : शेअर बाजारांशी संबंधित विविध सेवा देणारी वित्त सेवा क्षेत्रातील पुणे ई स्टॉक ब्रोकिंगचा आयपीओ सध्या जोरदार चर्चेत आहे.

IPO news : पुणे ई स्टॉक ब्रोकिंगच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी, उद्या शेवटचा दिवस
IPO news : पुणे ई स्टॉक ब्रोकिंगच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी, उद्या शेवटचा दिवस (https://www.pesb.co.in/)

शेअर बाजारात रोजच्या रोज नवनवे आयपीओ धडकत असून गुंतवणूकदारांना संधी उपलब्ध होत आहे. मागील आठवड्यात ७ मार्च रोजी बाजारात आलेला पुणे ई स्टॉक ब्रोकिंगचा आयपीओ सध्या जोरदार चर्चेत आहे. उद्या, १२ मार्चपर्यंत हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला राहणार आहे.

आयपीओच्या माध्यमातून ३८.२३ कोटी रुपये उभारण्याचं पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगचं लक्ष्य आहे. आयपीओसाठी प्रति शेअर ७८ ते ८३ रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ५० टक्के आणि  इतरांसाठी १५ टक्के असा कोटा आहे. हा आयपीओ SME IPO असून तो बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होणार आहे.

काय करते ही कंपनी?

पुणे ई – स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड (PESB) ही एक कंपनी वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. २००७ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. ही कंपनी सीटीसीएल (कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर लिंक) टर्मिनल्स, वेब इंटरफेस आणि मोबाइल अ‍ॅप्स (अँड्रॉइड आणि आयओएस) च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना स्टॉक एक्सचेंज (एनएसई, बीएसई, एमसीएक्स) बरोबर इक्विटी, फ्युचर्स अँड ऑप्शन्स, करन्सी आणि कमोडिटीज ट्रेडिंगची सेवा देते. 

कंपनीच्या ग्राहकांमध्ये थेट ग्राहक आणि अधिकृत व्यक्तींचा समावेश आहे. हे ग्राहक दहापेक्षा जास्त शहरांमध्ये विखुरलेले आहेत. मार्च २०२३ पर्यंत एकूण ग्राहकांची संख्या ६०,६४० होती. दिल्ली आणि अहमदाबाद इथं कंपनीची दोन शाखा कार्यालये आहेत.

तज्ज्ञांना काय वाटतं?

पहिल्या दिवशी आयपीओला १३.०९ पट प्रतिसाद मिळाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून त्यांच्याकडून हा आयपीओ १८.३६ पट सब्सक्राइब झाला आहे, तर बिगर संस्थात्मक खरेदीदारांच्या विभागात हा आयपीओ ८.८६ पट सब्सक्राइब झाला आहे, असं chittorgarh.com च्या आकडेवारीत म्हटलं आहे. पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी या इश्यूला ७.०५ पट सब्सक्राइब केले. कंपनीच्या २७,४२,४०० समभागांच्या तुलनेत ३,५९,०५,६०० समभागांची बोली लागली आहे. 

पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग आयपीओ जीएमपी आज

पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगचा शेअर ग्रे मार्केटमध्ये ८३ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. हे लक्षात घेता हा शेअर १६६ रुपयांना सूचीबद्ध होऊ शकतो. ८३ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ही किंमत १०० टक्के जास्त असेल. दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूकदार या आयपीओसाठी अर्ज करू शकतात, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

 

(डिस्क्लेमर: वरील मते आणि शिफारसी वैयक्तिक विश्लेषक, तज्ञ आणि ब्रोकिंग कंपन्यांची आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्याच्याशी सहमत असेलच असं नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग