Business Ideas : उद्योग-व्यापार करताना उंटावरुन शेळ्या हाकणे धोक्याचे…
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : उद्योग-व्यापार करताना उंटावरुन शेळ्या हाकणे धोक्याचे…

Business Ideas : उद्योग-व्यापार करताना उंटावरुन शेळ्या हाकणे धोक्याचे…

HT Marathi Desk HT Marathi
Dec 02, 2024 12:44 PM IST

शहाण्याने इतरांवर कामे सोपवताना त्यांच्यावर संपूर्ण अवलंबून राहण्यापेक्षा चौकसपणे त्या कामातील अडचणी आधीच समजून घेत काम तडीस लावणे गरजेचे असते. पदरखर्च होत असेल तेथे समस्यांना स्वतः भिडावे लागते. उंटावरुन शेळ्या हाकण्यात काहीच मतलब नसतो.

उद्योग करताना उंटावरुन शेळ्या हाकणे धोक्याचे असते
उद्योग करताना उंटावरुन शेळ्या हाकणे धोक्याचे असते

 

धनंजय दातार

दुबईमध्ये माझा एक बंगला (व्हिला) होता. तो रिकामा ठेवण्यापेक्षा मी विशेषतः परदेशांतून दुबईत काही महिने मुक्काम करणाऱ्यांना भाड्याने देत असे. एकदा एका मलेशियन महिलेने तो बंगला भाड्याने घेतला. तिला वर्ष - दीड वर्षाची लहान मुलगी होती. त्या दोघी बंगल्यात एकट्या राहू लागल्या. त्यांच्या सोबतीला अन्य कुणी विशेषतः पुरूष माणूस नसल्याचे आणि त्यांच्याकडे नातलगांचा फारसा राबता नसल्याचे मला आश्चर्य वाटायचे. त्या महिलेने आपल्या कुटुंबियांबाबत माहिती दिलेली नव्हती किंवा नवऱ्याचाही उल्लेख केला नव्हता. त्यावरुन तिची काही कौटुंबिक समस्या असावी, असा अंदाज मी बांधला. या महिलेचा पती ब्रिटीश नागरिकत्वाचा असून दोघांचे पटत नाही, इतके माझ्या कानावर आले होते. पण नसत्या चौकशा करुन तिच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचे आपल्याला काय कारण, या विचाराने मी गप्प बसणे पसंत केले.

काही दिवसांनी बंगल्यातील पाणीपुरवठ्यात अडथळा येत असल्याच्या तक्रारी त्या महिलेकडून येऊ लागल्या. पाणी खेचणारी वीजमोटर बंद पडली, की नळाला पाणी येत नसे. मग चिंताग्रस्त होऊन ती महिला मला वारंवार फोन करत असे. कदाचित पाईप लाईनमध्ये प्रॉब्लेम असावा, या शंकेने मी माझ्या माणसांना तपासणीसाठी पाठवले, परंतु त्यांनी मोटरसकट सर्व काही नवे असल्याचे सांगून पाईपमध्ये काही दोष नसल्याचा निर्वाळा दिला. मी गोंधळात पडलो. नंतर मी बंगल्याच्या देखभालीचे काम एका व्यावसायिक कंपनीकडे सोपवले. त्यांचा माणूस मात्र फोन केल्यावर लगेच येऊन मोटर त्वरित चालू करुन द्यायचा. 

कंपनी आम्हाला आकारत असलेल्या देखभाल खर्चाच्या बिलात या जादा कामाचे शुल्क वारंवार नमूद होऊ लागल्याने मी सावध झालो. फोन केल्यावर काम होतंय, या समाधानात राहण्यापेक्षा ती मोटर वारंवार बंद का पडते आणि एकाच माणसाला ती चालू कशी करता येते, याचा छडा लावण्याचे मी ठरवले. बिल्डिंग मेन्टेनन्स विषयातील तज्ज्ञ आणि वीजमोटार बनवणाऱ्या कंपनीचा सर्व्हिसमन अशा दोघांना सोबत घेऊन मी स्वतः पाहाणी केली. त्यावेळी समजले, की त्या मोटरला तळाच्या बाजूला एक लाल रंगाचे बटण होते आणि ते दाबल्यावर बंद पडलेली मोटर आपोआप सुरु व्हायची. समस्या येताच मोटरचे रीसेटिंग करण्याची सुविधा कंपनीने आधीपासूनच दिली होती फक्त आम्हाला ते ठाऊक नव्हते. ते बटण कशासाठी आहे, हे आम्ही कधीच विचारले नव्हते. या अज्ञानाची किंमत मला दरखेपेस चुकवावी लागत होती. मी त्या भाडेकरु महिलेला ती लाल बटण दाबण्याची युक्ती समजाऊन दिली. तिला खूप समाधान वाटले. संभाषणाच्या ओघात ती सहज म्हणाली, “या किरकोळ कामासाठी तुम्ही स्वतः येण्याची तसदी घेतलीत, याचे विशेष वाटते.” त्यावर मी म्हणालो, “मॅडम, उलट मीच यातून एक मोठा धडा शिकलो आहे. कोणतेही काम इतरांवर सोपवून अथवा संपूर्ण हवाला ठेऊन आपण बेफिकीर बसू नये. अन्यथा नुकसान आपलेच होते. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या येतात पण त्यातील केवळ दहा टक्के समस्या काही न करताच आपोआप सुटतात. बाकी ९० टक्के समस्या आपल्याला पुढे होऊन तटवाव्या लागतात. 

हे थोडे क्रिकेटसारखे आहे. संघ अडचणीत असताना अनुभवी फलंदाज काही चेंडू तटवून काढतो तर काही चेंडू चक्क सोडून देतो, पण स्वतःला बाद होऊ देत नाही. आपलेही तसेच आहे. जोवर आपण समस्येला तोंड देणार नाही, तोवर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसणार नाही म्हणूनच मी येथे प्रत्यक्ष आलो.” माझे बोलणे ती महिला लक्षपूर्वक ऐकत होती. काही महिन्यानंतर ती महिला माझ्या ऑफिसमध्ये निरोप घेण्यासाठी आली. याखेपेस तिच्यासमवेत तिचा परिवारही होता. नवऱ्याशी दिलजमाई झाली असून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने बंगला सोडत असल्याचे तिने मला आनंदाने सांगितले. एक विस्कटू पाहणारे घर पुन्हा उभे राहात असल्याचा मलाही आनंद झाला आणि त्या महिलेच्या उद्गारांनी समाधानही वाटले. ती मला म्हणाली, “त्यादिवशी तुमच्या सांगण्यावर मी शांतपणे विचार केला. तुमचे अगदी खरे आहे. आपल्या समस्यांना आपणच भिडावे लागते. नवऱ्याशी दुरावा ही माझी समस्या होती. त्यावर मित्रमैत्रिणींना, नातलगांना किंवा वकिलाला उपाय काढायला सांगून काही उपयोग नव्हता. मी नवऱ्याला तुमच्या बंगल्यात बोलवून घेतले. तेथे आम्ही समंजसपणे आमच्यातील वादाचे मुद्दे निकालात काढले. एका लहानशा समस्येने आपल्या दोघांनाही खूप काही शिकवले.” ‘जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’, हे वचन खरे आहे.

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

Whats_app_banner