Share Market News : योग्य शेअरची निवड आणि संयम या दोन गोष्टी जुळून आल्या तर शेअर बाजारात किती नफा होईल याला कुठलीही मर्यादा नाही. पीटीसी इंडस्ट्रीजच्या शेअरनं हेच दाखवून दिलं आहे. एका हजारपेक्षा जास्त शेअर असलेल्या सर्व गुंतवणूकदारांना या शेअरनं आज पुन्हा एकदा एका दिवसात लखपती केलं आहे.
पीटीसी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये १० टक्क्यांची वाढ दिसून आली आणि शेअरचा भाव १७१६६.८५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेर हा शेअर १६,९०० रुपयांवर बंद झाला. सोमवारच्या बंद किंमतीच्या तुलनेत ही वाढ ८.०२ इतकी आहे. आणखी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आज एका दिवसात या शेअरच्या किंमतीत तब्बल १२५४.५० रुपयांची वाढ झाली. म्हणजेच एखाद्याकडं या कंपनीचे १ हजार शेअर असतील तर आज त्याला साडेबारा लाखांचा फायदा झाला असेल.
मागील महिन्यात १८ डिसेंबर रोजी पीटीसी इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत ११२३१.८५ रुपये होती. त्यानंतर या ‘बीएसई ५००’ कंपनीच्या शेअरच्या किमतीत ५३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. अवघ्या तीन आठवड्यांत पीटीसी इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत २९ टक्क्यांनी वाढली आहे. पीटीसी इंडस्ट्रीजनं गेल्या दोन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये १३७ टक्के आणि कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये १२४ टक्के वाढ झाली आहे.
दिग्गज गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल यांची पीटीसी इंडस्ट्रीजमध्ये मोठी गुंतवणूक आहे. त्यांच्याकडं कंपनीचे १.६० लाख शेअर्स आहेत. हा आकडा पीटीसीच्या एकूण शेअर होल्डिंगच्या १.०७ टक्के आहे. हा आकडा सप्टेंबर तिमाहीपर्यंतचा आहे.
पीटीसी इंडस्ट्रीजसाठी सप्टेंबर तिमाही चांगली ठरली. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ११२ टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीचा नफा १७.३१ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ८.१४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. त्याचबरोबर उत्पन्नही वार्षिक आधारावर ३४ टक्क्यांनी वाढून ८०.७९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
संबंधित बातम्या