मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PSU stocks : एनडीए सरकारचा शपथविधी होताच 'हे' सरकारी शेअर उसळले! तुमच्याकडं आहेत का?

PSU stocks : एनडीए सरकारचा शपथविधी होताच 'हे' सरकारी शेअर उसळले! तुमच्याकडं आहेत का?

Jun 10, 2024 11:26 AM IST

PSU Stocks : सलग तिसऱ्यांदा भाजपच्याच नेतृत्वाखाली सत्ता येत असल्यानं धोरणात्म सातत्या राखलं जाणार असून त्याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटत आहेत.

PSU stocks : एनडीए सरकारचा शपथविधी होताच 'हे' सरकारी शेअर उसळले!
PSU stocks : एनडीए सरकारचा शपथविधी होताच 'हे' सरकारी शेअर उसळले!

PSU stocks : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेल्या जोरदार विक्रीमुळं गडगडलेले बहुतेक कंपन्यांचे शेअर आता सावरू लागले आहेत. सरकारी कंपन्याही त्यास अपवाद नाहीत. एनडीए सरकारनं शपथविधी झाल्यानंतर आता सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये नवी बहार आली आहे. निफ्टी ५० मधील पॉवर ग्रिड, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एनटीपीसीचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रीय शेअर बाजारात पॉवर ग्रिडचा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा शेअर ३.६ टक्क्यांनी वधारून ३२०.३५ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर, स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) शेअर १ टक्क्यांनी वधारून ८३६.६५ रुपयांवर तर एनटीपीसीचा शेअर एक टक्क्यांनी वधारून ३६७.३५ रुपयांवर पोहोचला आहे.

एक्झिट पोलनंतर उसळलेला बाजार प्रत्यक्ष निकालानंतर पुरता गडगडला होता. मात्र, भाजपच्याच नेतृत्वाखाली सरकार येणार असल्याचं स्पष्ट होताच पुन्हा बाजार सावरू लागला. धोरणात्मक सातत्य राहणार असल्याचं लक्षात येताच उद्योग जगत आश्वस्त झालं आहे. विशेषत: सरकारी कंपन्यांच्या दृष्टीनं हे सकारात्मक मानलं जात आहे. त्यामुळंच सरकारच्या शपथविधीनंतर सरकारी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी दिसत आहे.

सेन्सेक्सनं ओलांडला ७७ हजारांचा टप्पा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) २०२४-२५ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ७ टक्क्यांवरून ७.२ टक्क्यांवर नेला आहे. त्यामुळं शेअर बाजारात आशावाद निर्माण झाला असून सेन्सेक्सनं सलग चौथ्या दिवशी ७७,००० चा टप्पा ओलांडला. बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ३८५.६८ अंकांनी वधारून ७७०७९.०४ आणि एनएसई निफ्टी १२१.७५ अंकांनी वधारून २३,४११.९० अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. सेन्सेक्सच्या ३० कंपन्यांपैकी पॉवर ग्रिड, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसीचे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि टायटन यांचे समभाग सर्वाधिक घसरले.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. यातील विश्लेषकांची मतं त्यांची स्वत:ची आहेत. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

WhatsApp channel
विभाग