Dividend Stock : गुंतवणूकदारांना सातत्यानं डिविडंड देणारी सरकारी कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) लिमिटेडनं पुन्हा एकदा धमाका केला आहे. कंपनीनं डिविडंड जाहीर करत २ नोव्हेंबर २०२४ रेकॉर्ड डेटही निश्चित केली आहे.
कंपनीनं स्टॉक एक्सचेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, एनटीपीसीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी, २४ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. त्याच दिवशी कंपनीकडून लाभांशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. एनटीपीसीनं आतापर्यंत ३० पेक्षा जास्त वेळा लाभांश दिला आहे.
२०२४ मध्ये कंपनीनं आतापर्यंत २ वेळा डिव्हिडंड जाहीर केला आहे. कंपनीनं यावर्षी ६ फेब्रुवारी २०२४ आणि ७ ऑगस्ट २०२४ रोजी एक्स-डिव्हिडंडचा व्यवहार केला आहे. त्यानंतर कंपनीनं अनुक्रमे २.२५ रुपये आणि ३.२५ रुपये लाभांश दिला आहे.
एनटीपीसी लिमिटेडनं १९ मार्च २०१९ रोजी एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार केला. त्यावेळी कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना १:५ या दरानं बोनस शेअर्स दिले होते. कंपनीचा हा पहिलाच बोनस इश्यू होता.
गेल्या वर्षभरात एनटीपीसी लिमिटेडच्या शेअरच्या किमती ७७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर, ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत २१ टक्के परतावा मिळाला आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४४८.३० रुपये आणि कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २२७.७५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ४,११,८६५.८९ कोटी रुपये आहे.
या कंपनीत सरकारचा ५१.१० टक्के हिस्सा आहे. विदेशी गुंतवणूकदारांची भागीदारी १८.६० टक्के आहे. तर, जनतेचा वाटा ९.२ टक्के आहे.