Share Market News : आठवड्याच्या पहिल्या दिवशी झालेल्या घसरणीनंतर बाजार किंचित सावरत असला तरी सार्वजनिक क्षेत्रातील बहुतांश बँकांचे शेअर गडगडले आहेत. केंद्र सरकारचा एक निर्णय यासाठी कारणीभूत ठरला आहे.
केंद्र सरकार काही बँकांतील आपला हिस्सा कमी करणार आहे. याचे थेट पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक (IOB), युको बँक (UCO Bank), पंजाब अँड सिंध बँक (PSB) आणि बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) या पाच सरकारी बँकांचे शेअर्स आज गडगडले आहेत.
सेंट्रल बँकेचा शेअर ८ टक्क्यांनी घसरून ५०.९० रुपयांवर आला. आयओबीचा शेअर ७.४० टक्क्यांनी वधारून ४९.७९ रुपयांवर पोहोचला. युको बँकेचा शेअर ६.६९ टक्क्यांनी अधिक घसरून ४२.२४ रुपयांवर आला. तर, पंजाब अँड सिंध बँकेचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरून ४५.६६ रुपयांवर आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर ३.३ टक्क्यांनी घसरून ५१ रुपयांवर आला आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारनं क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) मार्गाने ५ सरकारी बँकांना १०,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. चौथ्या तिमाहीपासून छोट्या हप्त्यांमध्ये निधी संकलनाची प्रक्रिया सुरू होईल. सीएनबीसी-टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाला ऑफर फॉर सेल (OFS) मार्गानं या बँकांमधील हिस्सा विकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑगस्ट २०२६ पर्यंत या सरकारी बँकांमध्ये २५ टक्के किमान पब्लिक शेअरहोल्डिंगचे निकष पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
अर्थ मंत्रालयानं जनसुरक्षा आणि मुद्रा योजनेसह विविध वित्तीय समावेशक योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला खासगी क्षेत्रातील बँकांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत पीएम स्वनिधी योजनांसह विविध वित्तीय समावेशक योजनांच्या प्रगतीवर चर्चा आणि आढावा घेण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या