एकूण महागाई आणि शिक्षणाचा खर्च पाहता मुलांच्या भवितव्याचे नियोजन त्यांच्या जन्मानंतर लगेचच सुरू करायला हवं असं अनेक पालकांना वाटू लागलं आहे. नव्हे हे काम मुलांच्या जन्माच्याही आधी व्हायला हवं असं काहींचं म्हणण आहे. मुलांच्या नावे गुंतवणूक करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते, याबाबत गुंतवणूक सल्लागार काय सल्ला देतात? याविषयी या लेखातून जाणून घेणार आहोत.
पुण्यात एका खासगी कंपनीत काम करणारे हर्षल मजीठिया (वय ३०) यांनी पत्नीच्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीतच मुलाच्या भवितव्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आपल्या फायनान्शियल प्लॅनरशी संपर्क साधला होता. मजीठिया सांगतात, ‘मुलीच्या नावे बँक खाते उघडण्यासाठी मी जन्मानंतर आठवडाभरातच तिचा जन्माचा दाखला तयार करून घेतला. ४५ दिवसांच्या आत आम्ही तिचं पॅनकार्ड, आधारकार्ड आणि पासपोर्ट देखील तयार केले. तिचे शिक्षण आणि लग्नासाठी आम्ही तिच्या नावे डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंड आणि सोन्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला’ असं मजीठिया म्हणाले.
नोएडा येथील समिक्षा श्रीवास्तव (वय ३४) यांनीही त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच तिच्या नावे बँक खाते उघडून सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) एकरकमी गुंतवणूक केली होती. सुकन्या समृद्धी योजनेचे अकौंट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जाऊ शकते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०-सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर वजावट मिळू शकते. श्रीवास्तव म्हणतात, ‘आम्ही टर्म प्लॅनही खरेदी केला, म्युच्युअल फंडात सिस्टेमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) सुरू केला आणि ज्वेलर्ससोबत गोल्ड मॉनिटायझेशन स्कीममध्ये गुंतवणूक केली’ असं त्यांनी सांगितलं.
पालक जोपर्यंत मुलाच्या खात्यात गुंतवणूक करू इच्छित नाहीत तोपर्यंत मुलाच्या नावाने बँक खाते उघडणे आवश्यक नसल्याचं सल्ला गुंतवणूक सल्लागार देतात. १८ वर्षांखालील अल्पवयीन व्यक्तीला संयुक्त खातेदार म्हणून पालकांपैकी एकालाच बँक खाते उघडता येते. मग अल्पवयीन मुलाचे बँक खाते असणे का आवश्यक आहे? निमित कन्सल्टन्सीचे संस्थापक नितेश बुद्धदेव यांच्या मते, 'सर्व गुंतवणूक स्वतःच्या नावावर असल्यास गुंतवणूकदार ग्राहक त्यांच्या आर्थिक योजनांच्या कालावधीपर्यंत कायम राहतीलच असे नाही. विविध कारणांसाठी ते त्यातून स्वतःची सुटका करून घेतात. पण जर गुंतवणूक मुलांच्या नावावर असेल तर ते ती काढून घेण्यात संकोच करतात. मुलाच्या नावावर केलेल्या भांडवली गुंतवणुकीच्या नफ्यावर मुल १८ वर्षाचं झाल्यानंतर कर आकारला जात असल्याने पालकांना दीर्घकालीन गुंतवणुकीवरील कर कमी होण्यास मदत होते.
मुलाच्या नावाने असलेल्या म्युच्युअल फंड किंवा मुदत ठेव अकौंटमधून वयाच्या १८ वर्षापूर्वी रक्कम काढल्यास ते करपात्र असते. ज्या आई-वडिलांनी जास्त उत्पन्न आहे त्यांच्या उत्पन्नाशी याचा ताळमेळ घातला जातो. वर्षाला १,५०० रुपयांपर्यंतचे निष्क्रिय उत्पन्न करमुक्त असून ही सवलत एका कुटुंबात दोन मुलांपुरती मर्यादित असते. या नियमाला एक अपवाद आहे. जर १८ वर्षाखालील मूल त्यांच्यातली विशेष प्रतिभा किंवा कौशल्यामुळे एकरकमी उत्पन्न मिळवत असेल तर ते करपात्र असते. त्यांच्या नावाने स्वतंत्र इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरावा लागतो, अशी माहिती नितेश बुद्धदेव यांनी दिली. मुलाचे वय १८ वर्षे झाल्यानंतर केवायसी (Know Your Customer) ची प्रक्रिया नव्याने करावी लागते. आणि त्यानंतर बँक खाते ज्वाइंट राहत नाही.
वाढदिवस किंवा इतर प्रसंगी मुलांना दिल्या जाणाऱ्या रोख आणि धनादेशांच्या स्वरूपातील भेटवस्तू हे सुद्धा मुलांच्या नावे बँक खाते उघडण्यामागे एक कारण असते. आई-वडिलांशिवाय इतर नातेवाईकांना मुलाच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर ते ही कामी येते. आजी-आजोबा नातवंडांच्या नावे मुदत ठेवी ठेवतात. मात्र, यात कराचा फायदा होत नाही. मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. म्युच्युअल फंड किंवा इतर वित्तीय उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५६ (२) अन्वये पालक अथवा नातेवाईक यांच्यावर कोणताही कर न पडता थेट मुलाच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करता येते. पालक ही रक्कम म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवू शकतात किंवा दीर्घ मुदतीसाठी एसआयपी सुरू करू शकतात असा सल्ला 'सोलुफिन'च्या संस्थापक मोहिनी महादेविया यांनी दिला आहे. दरम्यान, नातेवाईकांकडून वर्षाला ५० हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू या करमुक्त असतात.
घरात मुलगी जन्माला आल्यानंतर अनेक पालक सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) मध्ये गुंतवणूक करतात. लॉक-इन चा दीर्घ कालावधी लक्षात घेता या निधीचा चांगला वापर करता येऊ शकतो. या योजनेत लॉक-इन कालावधी २१ वर्षे किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळेपर्यंत, जो आधी असेल, तो असतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर पालक या योजनेतून ५० टक्के रक्कम काढू शकतात. इतर मोठी गुंतवणूक इक्विटीशी निगडित असेल तरच या योजनेत गुंतवणूक करावी, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतात. या गुंतवणूक मार्गांव्यतिरिक्त विमा आणि म्युच्युअल फंड उद्योगांकडून बालकांसाठी विशिष्ट अशा काही योजना लोकप्रिय आहेत.
डायरेक्ट इक्विटीबाबत बोलायचे झाल्यास अल्पवयीन मुलाच्या नावाने डिमॅट खाते उघडता येते, पण बाजारातून शेअर्स खरेदी करण्यासाठी पालकांना खाते वापरण्याची परवानगी नसते. ‘शेअर खरेदी करण्याचे दोन मार्ग असतात. पहिला म्हणजे आयपीओ, सोने आणि इतर रोखे आणि कर्जरोखे (अल्पवयीन मुलांना त्यात गुंतवणूक करण्याची परवानगी आहे असे गृहीत धरल्यास). दुसरे म्हणजे गिफ्ट (ट्रान्सफर) सिक्युरिटीज जे मुलाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकतात’ असं सोलुफिनच्या संस्थापक मोहिनी महादेविया सांगतात. मुलांना ट्रेडिंग खाते उघडता येते. परंतु त्यांना थेट स्टॉक खरेदी किंवा विक्रीसाठी स्टॉक ब्रोकरशी करार करण्यास मनाई आहे.
तुमचं मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर त्यांच्या नावावर असलेल्या सर्व गुंतवणुकीचे मालक बनतो. अशावेळी मुलाने त्याच्या अकौंटवर असलेला पैसे वाया घालवले तर?, ही भीती पालकांच्या मनात असू शकते. त्यामुळे जेव्हा मुलांना मोठ्या प्रमाणात पैसे देणे योग्य असेल तेव्हाच त्यांच्या नावावर गुंतवणूक करा, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतात. मुलांच्या नावे गुंतवणूक करत असताना आणखी एक पैलू विचारात घ्यायला हवा. सर्व पालकांकडे एकाच वेळी निवृत्तीनंतर जगण्यासाठीचा निधी आणि मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी पुरेसा निधी असेलच असं नाही. तुमचं मुलाचं उच्च शिक्षण सुरू होईस्तोवर तुमच्या निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन झालेले नसेल अशावेळेस मुलासाठी शैक्षणिक कर्ज घेणे कधीही चांगले, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतात.