मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Evoq Remedies : शेअर उसळताच कंपनीच्या मालकांनी केली मोठी खेळी; गुंतवणूकदार हादरले

Evoq Remedies : शेअर उसळताच कंपनीच्या मालकांनी केली मोठी खेळी; गुंतवणूकदार हादरले

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 12, 2024 08:59 PM IST

Evoq Share Price : इव्होक कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर आणि शेअरच्या उसळीनंतरही प्रवर्तकांनी कंपनीतील आपली हिस्सेदारी विकल्यानं खळबळ उडाली आहे.

Share Market news
Share Market news

आठवड्याचा शेवटचा दिवस फार्मा क्षेत्राशी संबंधित इव्होक रेमेडीजच्या गुंतवणूकदारांसाठी मोठ्या घडामोडींचा ठरला. इव्होक रेमेडीजच्या शेअरनं आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठत गुंतवणूकदारांना खूष केलं, पण त्यांचा हा आनंद अवघे काही क्षण टिकला. शेअरनं उसळी घेताच प्रवर्तकांनी आपली हिस्सेदारी विकली आणि शेअर पुन्हा गडगडला. त्यामुळं गुंतवणूकदारांची अक्षरश: पळापळ झाली.

इव्होक रेमेडीजच्या शेअरला आज चांगलीच मागणी होती. या शेअरनं १९.४४ रुपयांपर्यंत मजल मारत ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. शेअरनं हा उच्चांक गाठताच प्रवर्तकांनी काढता पाय घेतला. तेजीच्या लाटेतील गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांत प्रवर्तकांनी तब्बल ७२ टक्के हिस्सेदारी विकली आहे. परिणामी शेअरचा भाव १५ टक्क्यांनी घसरून १५ रुपयांच्याही खाली आला. दिवसअखेर शेअरची किंमत १५.५० रुपये होती. मागील किंमतीच्या तुलनेत ही घसरण ८.२८ टक्के आहे.

अ‍ॅमेझॉनवर उद्यापासून सिक्रेट सेल! काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया!

गुरुवारी लागलं होतं अप्पर सर्किट

मोठी निर्यात ऑर्डर मिळवल्याची घोषणा इव्होक रेमेडीजनं केल्यानंतर गुरुवारी कंपनीचे शेअर्स २० टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर होते. कंपनीला १३६ कोटी रुपयांची निर्यातीची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर कंपनीच्या बाजार भांडवलापेक्षा जवळपास ७ पट जास्त आहेत. अमेरिकास्थित मार्लेक्स फार्मा कंपनीकडून ही ऑर्डर मिळाली आहे.

छोट्या कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्यानं गुंतवणूकदार खूश झाले आणि शेअर खरेदीसाठी झुंबड उडाली. त्यामुळं भाव तब्बल २० टक्क्यांनी वाढला. कंपनीचे प्रवर्तक भूमिष्ठ नरेंद्रभाई पटेल आणि पायल भूमिष्ठ पटेल यांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकले. बीएसईच्या बल्क डील विभागात ही आकडेवारी उपलब्ध आहे. 

मुकेश अंबानींची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे, अवघ्या २४ तासांत झाली ‘इतकी’ वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, भूमिष्ठ नरेंद्रभाई पटेल यांनी ३०.६ लाख शेअर्स आणि पायल पटेल यांनी १८.५ लाख शेअर्स विकले. प्रवर्तकांनी भागविक्री केल्याच्या बातमीनं गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली.

सप्टेंबर तिमाहीचा निकाल

शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, सप्टेंबर तिमाहीत भूमिष्ठ नरेंद्रभाई पटेल यांच्याकडं एकूण ५४,९९,५७४ शेअर्स होते. जवळपास ४० टक्क्यांच्या वर शेअर त्यांच्याकडं होते. तर, पायल यांच्याकडं ३३.९९ टक्के हिश्श्याचे ४५,००,०७१ शेअर्स होते. मात्र, शेवटच्या दोन दिवसांतील विक्रीनंतर त्यांच्याकडं आता केवळ २०.५ टक्के हिस्सा राहिला आहे.

ऑर्डरवर शंका

मनीकंट्रोलच्या बातमीनुसार, ज्या अमेरिकन फर्मकडून कंपनीला ऑर्डर मिळाली आहे, त्या कंपनीचं नाव चुकीचं आहे. Marlexx Pharma नावाची कंपनीच अस्तित्वात नाही. गुगलवर या कंपनीचं नावच सापडत नाही. असंच नाव असलेली आणखी एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. मात्र या कंपनीचं नाव Marlexx नसून Marlex आहे. आता ही अतिरिक्त x ही टायपिंगची चूक आहे की प्रवर्तकांकडून किरकोळ गुंतवणूकदारांना अडकवण्याचा मार्ग आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

WhatsApp channel

विभाग