मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend News : एका शेअरवर तब्बल २०० रुपये डिविडंड देतेय 'ही' कंपनी, आज शेवटची संधी

Dividend News : एका शेअरवर तब्बल २०० रुपये डिविडंड देतेय 'ही' कंपनी, आज शेवटची संधी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 13, 2024 12:06 PM IST

Proctor and gamble health ltd dividend : प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेड या कंपनीनं घोषित केलेल्या भरघोस लाभांशाचा लाभ घेण्यासाठी आज शेवटची संधी आहे.

Share Dividend News
Share Dividend News

Procter & Gamble Health Ltd Dividend News : शेअर बाजारात ट्रेडिंग न करता केवळ लाभांशातून कमाई करणाऱ्या वा करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रॉक्टर अँड गम्बल हेल्थ लिमिटेड या कंपनीनं लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनी एका शेअरवर २०० रुपये लाभांश देणार आहे.

पी अँड जी हेल्थ लिमिटेड कंपनीनं २५ जानेवारी २०२४ रोजी स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनी गुंतवणूकदारांना एका शेअरवर १५० रुपयांचा विशेष लाभांश देणार आहे. तर, १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर ५० रुपयांचा अंतरिम लाभांश देणार आहे. कंपनीनं या लाभांशासाठी १४ फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

२००१ पासून कंपनी देतेय लाभांश

प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेड ही कंपनी गेल्या २३ वर्षांपासून नियमित लाभांश देत आहे. याआधी २०२३ मध्ये कंपनीनं एका शेअरवर ९५ रुपये लाभांश दिला होता. ज्या गुंतवणूकदारांची नावं आज कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असतील, त्यांना ३ मार्च रोजी किंवा त्याआधी लाभांश मिळेल. आतापर्यंत या कंपनीनं एकदाही बोनस शेअर्स दिलेले नाहीत.

कशी आहे कंपनीची शेअर बाजारातील कामगिरी?

प्रॉक्टर अँड गॅम्बलचे शेअर्स मंगळवारी १.४१ टक्क्यांच्या घसरणीसह ५४८२.३० रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने स्टॉक होल्ड करून ठेवला होता, त्यांना ३.८३ टक्के नफा झाला आहे.

शेअर बाजारात कंपनीची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५६४२.८५ रुपये प्रति शेअर आहे तर, ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ४४९२.८० रुपये प्रति शेअर आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग