Stock Market Updates : किरकोळ विक्री (FMCG) क्षेत्रातील दिग्गज कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडनं डिसेंबर अखेरचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या निकालांबरोबरच कंपनीनं शेअरहोल्डर्सना भरघोस लाभांशाची भेट दिली आहे. कंपनीनं एका शेअरवर ११० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअरनं स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, कंपनीच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत इतर गोष्टींबरोबरच आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी प्रति इक्विटी शेअर ११० रुपये अंतरिम लाभांश (प्रत्येकी १० रुपये अंकित मूल्य) जाहीर केला आहे. लाभांश ७ मार्च २०२५ पर्यंत दिला जाईल.
३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा १८ टक्क्यांनी वाढून ३६४ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थकेअरला ३०८.५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचं कामकाजातून मिळणारं उत्पन्न १०.३ टक्क्यांनी वाढून १,२४७.६ कोटी रुपये झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ते १,१३१ कोटी रुपये होतं. ऑपरेशनल लेव्हलवर, एबिटडा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ३९ टक्क्यांनी वाढून ३७१ कोटी झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो ६०७.७ कोटी रुपये होता.
प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थकेअरचा शेअर आज १.४१ टक्क्यांनी घसरून ५२५५ रुपयांवर बंद झाला. मागील वर्षभरात शेअरनं गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. तर, मागच्या पाच वर्षांत हा शेअर केवळ २२.२८ टक्क्यांनी वाढला आहे.
संबंधित बातम्या