Stock Market News Updates : सोलर मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा शेअर सोमवारी बाजारात चर्चेत होता. कंपनीचा शेअर आज ४ टक्क्यांनी वधारून ११०४.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागे १,०८७ कोटी रुपयांच्या मोठ्या ऑर्डर्स आहेत.
प्रीमिअर एनर्जीज ग्लोबल एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड, प्रीमियर एनर्जीज इंटरनॅशनल प्रायव्हेट आणि प्रीमियर एनर्जीज फोटोव्होल्टिक प्रायव्हेट या उपकंपन्यांना एकूण १,०८७ कोटी रुपयांच्या अनेक ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
दोन मोठे स्वतंत्र वीज उत्पादक (IPP) आणि अन्य एका ग्राहकानं दिलेल्या या ऑर्डर्समध्ये सौर मॉड्यूलसाठी ९६४ कोटी रुपये आणि सौर सेलसाठी १२३ कोटी रुपयांचा समावेश आहे. प्रीमियर एनर्जीजनं बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, सौर मॉड्यूलचा पुरवठा जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांची ट्रेडिंग विंडो बंद असेल आणि २८ नोव्हेंबर २०२४ पासून पुन्हा उघडली जाईल.
प्रीमियर एनर्जीजच्या शेअरनं या वर्षी आतापर्यंत ३१ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सहा महिन्यांत या शेअरमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून एकाच महिन्यात हा शेअर १६.६ टक्क्यांनी वधारला आहे. पाच दिवसांत या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा आयपीओ यावर्षी ऑगस्टमध्ये आला होता. याची प्राइस बँड ४५० रुपये होती. त्यानंतर हा शेअर १४५ टक्क्यांनी वधारला आहे.