मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Solar Stocks News : पंतप्रधान मोदींनी एक घोषणा काय केली, सोलर कंपन्यांचे शेअर रॉकेटसारखे झेपावले!

Solar Stocks News : पंतप्रधान मोदींनी एक घोषणा काय केली, सोलर कंपन्यांचे शेअर रॉकेटसारखे झेपावले!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 23, 2024 06:01 PM IST

Solar stocks rise news : सौर ऊर्जेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका घोषणेचे थेट पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत.

PM Narendra Modi
PM Narendra Modi (ANI)

Share Market news updates : सरकारच्या विविध धोरणांचा वा निर्णयांचा शेअर बाजारावर नेहमीच परिणाम होत असतो. त्यातून कधी शेअर्सना फटका बसतो, तर कधी फायदा होतो. सौरऊर्जा निर्मितीमध्ये गुंतलेल्या कंपन्यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका घोषणेमुळं या कंपन्यांचे शेअर कमालीचे वधारले आहेत.

सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी तब्बल १९ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. देशातील एक कोटी घरांवर सौर यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. यामुळं गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वस्तात वीज उपलब्ध होईलच, शिवाय ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल, असं पंतप्रधान मोदी काल बोलताना म्हणाले.

PMSY : प्रधानमंत्री सूर्योदय योजना नेमकी आहे काय? नागरिकांना कसा होणार फायदा? जाणून घ्या!

पंतप्रधान मोदी यांच्या या घोषणेचे शेअर बाजारात सकारात्मक पडसाद उमटले आहेत. सोलर कंपन्यांचे शेअर झेपावले आहेत. सोलर ग्लास मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बोरोसिल रिन्यूएबल्सचा शेअर मंगळवारी १९ टक्क्यांनी वाढून ६०१.५० रुपयांवर पोहोचला. या कंपनीच्या शेअर्सनी आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. मागील आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बोरोसिल रिन्युएबल्सचे शेअर्स ५०७.३५ रुपयांवर बंद झाले होते. वेबसोल एनर्जी सिस्टीम या सौरऊर्जा व्यवसायाशी निगडीत कंपनीचे शेअर्स देखील मंगळवारी १० टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह ३००.८५ रुपयांवर पोहोचले.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या शेअर्समध्येही प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह ५२८.९५ रुपयांवर पोहोचले आहेत. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीसचे शेअर्स देखील ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह ३००८.८० रुपयांवर पोहोचले आहेत. टाटा समूहाची कंपनी टाटा पॉवरचा शेअरही ४ टक्क्यांहून अधिक वाढून ३६६.४० रुपयांवर पोहोचला आहे. टाटा पॉवरच्या शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.

WhatsApp channel