Reliance Power Share Price : अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स आज चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या रिलायन्स पॉवरच्या शेअरला आज सगल दुसऱ्यांदा ५ टक्के लोअर सर्किट लागलं आहे. याआधी शुक्रवारीही शेअरला लोअर सर्किट होतं.
गेल्या दोन दिवसात या शेअरमध्ये १० टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअर्सच्या या घसरणीमागे सेबीची (SEBI) कारवाई आहे. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडकडून पैसे वळवल्याप्रकरणी बाजार नियामक सेबीनं उद्योगपती अनिल अंबानी आणि अन्य २४ जणांवर सिक्युरिटीज मार्केटमधून ५ वर्षांची बंदी घातली आहे. तसंच, अनिल अंबानी यांना २५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अंबानी यांना कोणत्याही सूचीबद्ध कंपनीत किंवा बाजार नियामकाकडे नोंदणीकृत कोणत्याही युनिटमध्ये संचालकपद किंवा मुख्य व्यवस्थापकीय पद स्वीकारण्यास पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. सेबीनं रिलायन्स होम फायनान्सवर सिक्युरिटीज मार्केटमधून सहा महिन्यांची बंदी घातली असून त्यावर सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सेबीनं शुक्रवारी आपल्या २२२ पानांच्या आदेशात कंपनीचं व्यवस्थापन आणि प्रवर्तकांच्या निष्काळजी वृत्तीचा उल्लेख केला. मालमत्ता, रोख प्रवाह, नेटवर्थ किंवा महसुलाचे निकष पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांना रिलायन्स होम फायनान्सच्या व्यवस्थापनानं शेकडो कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं. यामागे धोकादायक हेतू असल्याचं दिसून येतं, अशी टिप्पणी सेबीनं केली आहे. यातील अनेक कर्जदारांचे आरएचएफएलच्या प्रवर्तकांशी निकटचे संबंध होते. या कर्जदारांनी कर्जाची योग्य परतफेड न केल्यानं कंपनीचे शेअरहोल्डर्स अडचणीत आले. रिलायन्स होम फायनान्सवरील सेबीच्या या कारवाईचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत.
रिलायन्स पॉवर ही ६ हजार मेगावॅटची वीजनिर्मिती करणारी कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या मार्च तिमाहीत कंपनी स्वतंत्र तत्त्वावर कर्जमुक्त झाली. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ३८ टक्के आणि गेल्या सहा महिन्यांत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या महिन्याभरात १० टक्के वाढ झाली आहे. २००८ मध्ये या शेअरची किंमत २४० रुपये होती. आतापर्यंत ९० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. रिलायन्स पॉवरमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) मोठा हिस्सा आहे. एलआयसीकडं रिलायन्स पॉवरचे १०,२७,५८,९३० म्हणजेच २.५६ टक्के शेअर्स आहेत.