Stock Market updates : सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) लिमिटेडच्या शेअरमध्ये सोमवारी ९ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी पातळीवर ४८९.४० रुपयांवर पोहोचला. याआधी हा शेअर ४४९.४५ रुपयांवर बंद झाला होता.
सप्टेंबर तिमाहीतील नफ्यात झालेली वाढ आणि तज्ज्ञांचा तेजीचा कल हे शेअर्समधील या तेजीमागचे कारण आहे. खरं तर, पीएफसीवर लक्ष ठेवून असलेल्या सर्व दहा विश्लेषकांनी हा शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपनीचा हा शेअर ६८० रुपयांपर्यंत च्या उच्चांकी पातळीवर पोहोचू शकतो. पीएफसीचे समभाग ५८० रुपयांच्या अलीकडील उच्चांकी पातळीवरून २२ टक्क्यांनी घसरले आहेत, तर शुक्रवारच्या बंद किमतीपेक्षा ते ५१ टक्क्यांची संभाव्य वाढ दर्शवित आहेत.
ब्रोकरेज फर्म सीएलएसएचे 'आउटपरफॉर्म' रेटिंग असून त्याची टार्गेट प्राइस ६१० रुपये आहे. बर्नस्टीनने ६२० रुपयांच्या टार्गेट प्राइससह शेअरवर आउटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवले आणि पीएफसीवरील यूबीएसची दुसरी सर्वोच्च लक्ष्य किंमत ६७० रुपये होती. ब्रोकरेज ने ते विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. डीएएम कॅपिटलची पीएफसीवर सर्वाधिक ६८० रुपयांची टार्गेट प्राइस आहे. पीएफसीचे शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत २३ टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये राष्ट्रपतींचा ५५.९९ टक्के मोठा वाटा आहे. हे प्रमाण १८४ कोटी शेअर्स इतके आहे.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा ९ टक्क्यांनी वाढून ७,२१४.९० कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीचा निव्वळ नफा ६६२८.१७ कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न २५७५४.७३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते २२,३८७.३२ कोटी रुपये होते, असे पीएफसीने बीएसईला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) कंपनीचा निव्वळ नफा १४ टक्क्यांनी वाढून १४,३९७ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १२,६१० कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीत एकत्रित निव्वळ अनुत्पादित मालमत्ता (NPA) ०.८० टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीत ०.९८ टक्के होती.