Dividend Stock : पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीनं गुंतवणूकदारांना खूषखबर दिली आहे. कंपनीनं ३५ टक्के लाभांश जाहीर केला आहे. लाभांशाची रेकॉर्ड डेट याच महिन्यात आहे. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं हा निर्णय घेतला आहे.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडनं दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. शेअरहोल्डर्सना एका शेअरवर ३.५० रुपये लाभांश मिळणार आहे. या लाभांशासाठी कंपनीने २५ नोव्हेंबर २०२४, सोमवार ही रेकॉर्ड डेट आहे. म्हणजेच या तारखेला ज्या गुंतवणूकदाराचं नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांना लाभांशाचा लाभ मिळणार आहे. याआधी ऑगस्टमध्ये कंपनीनं डिविडंड जाहीर केला होता. त्यावेळी प्रति शेअर ३.२५ रुपये लाभांश देण्यात आला होता.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर शुक्रवारी २.७० टक्क्यांनी घसरून ४४९.४५ रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २ वर्षात या सरकारी कंपनीने ३७२ टक्के परतावा दिला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५८०.३५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २६५.६५ रुपये आहे.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडनं २१ सप्टेंबर २०२३ रोजी एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार झाला होता. कंपनीने ४ शेअर्समागे एका शेअरचा बोनस दिला. त्यापूर्वी कंपनीने २०१६ मध्ये बोनस शेअर्स दिले होते. तेव्हा कंपनीनं एका शेअरवर एक शेअर मोफत दिला होता.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निव्वळ नफ्यात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ७२१४.९० कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ६६२८.१७ कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण महसूल २५७५४.७३ कोटी रुपये झाला आहे.