Polycab Share Price News Today : प्राप्तिकर विभागाच्या छाप्याच्या एका बातमीमुळं पॉलीकॅब इंडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. प्राप्तिकर विभागानं १० जानेवारी रोजी पॉलीकॅब इंडिया कंपनीशी संबंधित ठिकाणांची झाडाझडती घेतल्याचं वृत्त आहे. या वृत्तानंतर कंपनीचे शेअर्स आज मोठ्या तब्बल २२ टक्क्यांनी गडगडले.
पुणे, औरंगाबाद, मुंबई आणि नाशिकसह कंपनीशी संबंधित ५० ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. गुजरातमधील दमण आणि दिल्लीतही छापे टाकण्यात आले आहेत. याआधी मंगळवारी पॉलीकॅबचे शेअर ९ टक्क्यांनी घसरले होते. मागच्या एक महिन्यात कंपनीचे शेअर्स सुमारे ३० टक्क्यांनी घसरले आहेत.
अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर छाप्यादरम्यान कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. कंपनीनं मोठ्या प्रमाणात करचोरी केल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या कागदपत्रांवरून उघड झालं आहे. रोख पैशांत बेहिशेबी खरेदी-विक्री व्यवहार करणे, प्रत्यक्ष वाहतूक न करता कागदावर खर्च दाखवणे आणि कंत्राट व्यवसायात कंपनी गुंतल्याचं समोर आलं आहे.
कंपनीनं अंदाजे १००० कोटी रुपयांची विक्री रोख स्वरूपात केली आहे, या व्यवहाराची कुठंही नोंद झालेली नाही. ४०० कोटींहून अधिक किमतीची केवळ रोख रक्कम जमा झाली आहे. याशिवाय कंपनीनं कच्च्या मालाच्या खरेदीबाबतही माहिती दिलेली नाही. तसेच, कंत्राटी खर्च, खरेदी आणि वाहतूक खर्चाच्या १०० कोटी रुपयांच्या व्यवहारांचीही स्पष्ट आणि योग्य माहिती कंपनीकडं नाही, असं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.
प्राप्तिकर विभागानं ४ कोटींहून अधिक रोकड जप्त केली असून २५ हून अधिक बँक लॉकर्स सील केले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं केलेल्या इतर अनेक व्यवहारांचीही योग्य माहिती समोर आलेली नाही.
पॉलीकॅब इंडिया लिमिटेडनं स्टॉक एक्स्चेंजला अलीकडंच दिलेल्या माहितीमध्ये, कर चुकवेगिरीच्या वृत्ताचं खंडन केलं होतं. तसंच, डिसेंबर २०२३ मध्ये प्राप्तिकर खात्यानं घेतलेल्या झाडाझडतीतून नेमकं काय समोर आलं याची माहिती आम्हाला मिळाली नसल्याचं कंपनीनं स्टॉक एक्सचेंजला सांगितलं आहे.
पॉलीकॅब इंडियाचा शेअर आज बीएसईवर २२.४ टक्क्यांनी घसरून ३८१२.३५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. कंपनीच्या कार्यालयांवर छापे पडण्याची बातमी येण्याआधी हाच शेअर १४ डिसेंबर २०२३ रोजी ५७२२.९० रुपयांवर होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक होता.
(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनी व शेअरची केवळ माहिती आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)